esakal | काय दिवस आले नशिबी... हॉटेल बंद करून लावले भाजीपाल्याचे दुकान 
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel

कोरोनामुळे हॉटेल बंद करावे लागले. पण, कोणतेही काम करताना लाज बाळगायची नाही, असा त्यांचा सुरुवातीपासून स्वभाव असल्याने त्यांनी हॉटेल बंद असल्यापासून हॉटेल समोरच भाजीपाल्याचे दुकान सुरू केले. 

काय दिवस आले नशिबी... हॉटेल बंद करून लावले भाजीपाल्याचे दुकान 

sakal_logo
By
तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : पोटाची आग आणि विपरीत परिस्थितीपुढे माणसाला गुडघे टेकावेच लागतात. याचा प्रत्यय तालुक्‍यात येत असून कोरोनाच्या संकटामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने आपला व्यवसाय बदलत भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

संपूर्ण देशात सध्या कोरोना व्हायरसने जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी सर्वच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यापासून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेऊन लॉकडाउनची घोषणा केली. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना संचारबंदी कालावधीत कोरोना रोगाची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना आपले हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यास सांगितले आहे. याचाच फटका तालुक्‍यातील लहान व्यावसायिकांना व हॉटेलचालकांना बसला आहे. लॉकडाउनमुळे तालुक्‍यातील सर्व शहर व ग्रामीण भागांतील लहान-मोठे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काही व्यावसायिकांनी हॉटेल समोरच जीवनावश्‍यक वस्तूंचे व्यवसाय सुरू केले आहेत. शहरातील हॉटेल व्यावसायिक अब्दुल करीम यांनीही हाच मार्ग पत्करला आहे. 

हॉटेलसमोरच थाटले दुकान 

अब्दुल करीम यांची पूर्वीची परिस्थिती गरिबीची व हलाखीची होती. परंतु त्यांचे वडील मोहम्मद हुसेन यांनी 55 वर्षांपूर्वी शहरातील जुन्या आठवडी बाजार परिसरात "मदीना हॉटेल' व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला हे हॉटेल चहाकरिता तालुक्‍यात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर या हॉटेलचा कारभार त्यांची मुले सांभाळू लागली. बघता बघता हे हॉटेल चहा, कॉफी, नाश्‍त्याकरिता संपूर्ण तालुक्‍यात प्रसिद्ध झाले. अब्दुल करीम यांना एकूण नऊ भावंडे असून त्यांची गुजराण या हॉटेलवरच आहे. एकूण चार पुरुष व चार महिला या संपूर्ण घराची मंडळी हे हॉटेल चालवीत आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार शहरातील दर्गा परिसरात राहतो. "छोटी आपा'चे हॉटेल म्हणून सर्वत्र हे हॉटेल प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात प्रगती साधली. पण, कोरोनामुळे हॉटेल बंद करावे लागले. पण, कोणतेही काम करताना लाज बाळगायची नाही, असा त्यांचा सुरुवातीपासून स्वभाव असल्याने त्यांनी हॉटेल बंद असल्यापासून हॉटेल समोरच भाजीपाल्याचे दुकान सुरू केले. 

अवश्य वाचा- लॉकडाउनने बैलबाजार बंद केला हो! कशी होणार मशागतीची कामे?

लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक समस्येला सामोर जावे लागत असल्याने हजारो व्यावसायिकांनी आपले पारंपरिक व्यवसाय बंद करून भाजीपाला तसेच फळ विक्रीचा धंदा सुरू केल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पानठेले चालकांनाही मोठा फटका बसला असून तेही छोटेमोठे काम करून आपला प्रपंच चालवीत आहेत. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने प्रशासनाने सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 
 

loading image