
नागभीड तालुक्यातील अनेक भागांत दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नवोदय विद्यालय फाट्याजवळ अनेकांची शेती आहे. पाऊस जोरदार सुरू झाल्याने शेतकाम करणारे, वाहनधारक नवोदय विद्यालयाजवळ असलेले हॉटेल तसेच बसथांब्यामध्ये थांबले होते. तेव्हाच वीज कोसळली.
नागभीड, तळोधी (जि. चंद्रपूर) : नागभीड तालुक्यात दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचावासाठी नवोदय विद्यालय फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली अनेकजण उभे होते. तेथेच वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, चौघे गंभीर जखमी, तर 15 ते 17 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 13) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अशोक कवडू तिरमारे (वय 54, रा. वलनी) आणि लोकचंद रामू पोहनकर (वय 12) यांचा समावेश आहे.
अवश्य वाचा- भंडारा पोलिस, शाब्बास! क्रेडिट कार्डमधून पळवलेली रक्कम दिली मिळवून परत
नागभीड तालुक्यातील अनेक भागांत दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नवोदय विद्यालय फाट्याजवळ अनेकांची शेती आहे. पाऊस जोरदार सुरू झाल्याने शेतकाम करणारे, वाहनधारक नवोदय विद्यालयाजवळ असलेले हॉटेल तसेच बसथांब्यामध्ये थांबले होते. तेव्हाच वीज कोसळली. त्यात अशोक कवडू तिरमारे, लोकचंद पोहनकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील श्यामराव बोरकर (रा. गिरगाव), मोरेश्वर दयाराम मडावी (रा. वलनी), गोपीचंद वासेकर (रा. वलनी), भास्कर किसन देशमुख (रा. तळोधी) हे जखमी झाले.
अवश्य वाचा- एसटीच्या मोफत पासचा असाही साईडइफेक्ट; ग्रामीण शाळांतील विद्यार्थीसंख्या लागली घटू...
लोकचंद हा मुलगा आजीच्या गावावरून मामासोबत सोनुर्लीकडे जात होता, तर अशोक तिरमारे हे शेतीच्या कामावर गेले होते. पाऊस लागल्याने दोघेही नवोदय फाट्याजवळ थांबले होते. चार जखमींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 15 ते 17 किरकोळ जखमींची तपासणी करून त्यांना सुटी देण्यात आली. याच तालुक्यातील मांगरुड येथे वीज पडून महानंदा जीवतोडे ही महिला जखमी झाली. तिला तळोधी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
संपादन राजेंद्र मारोटकर