esakal | 135  डाॅक्टरांच्या राजीनामास्त्राने कोलमडली आरोग्य यंत्रणा
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the resignation of the doctor, the health system collapsed during the covid period

कोविड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांसाठी 50 बेड आरक्षित ठेवण्यात यावे, अहवालासाठी वेळमर्यादा निश्‍चित करावी, या मागणीसाठी निवेदन घेऊन गेलेल्या राजपत्रित वैद्यकीय संघटनेच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्‍यांनी अपमानास्पद वागणूक दिली.

135  डाॅक्टरांच्या राजीनामास्त्राने कोलमडली आरोग्य यंत्रणा

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या युद्धाला अपमानास्पद वागणुकीमुळे खीळ बसली आहे. जिल्ह्यात 135 वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोविड काळात आरोग्ययंत्रणा कोलमडली असून, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या बदलीच्या मागणीसाठी विविध संघटनांनी ‘मॅग्मो’ला पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले. एका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांसाठी 50 बेड आरक्षित ठेवण्यात यावे, अहवालासाठी वेळमर्यादा निश्‍चित करावी, या मागणीसाठी निवेदन घेऊन गेलेल्या राजपत्रित वैद्यकीय संघटनेच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्‍यांनी अपमानास्पद वागणूक दिली. आपत्ती व्यवस्थापनाखाली ‘एफआयआर’ दाखल करण्याची धमकी दिली.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्यासह 135 वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामे दिले. मंगळवारी (ता.29) मॅग्मोने आंदोलनाची धार तीव्र करीत कामबंद केले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा कोलमडली. आरोग्य विभागात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. फेब्रुवारीपासून सर्व डॉक्टर मार्गदर्शक सूचनांनुसार काम करीत आहेत. सात महिन्यांत जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांची कुठेही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही, कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखविला जातो.

त्यामुळे मनोबल खचत असल्याचे पाठिंबा देणार्‍या विविध संघटनांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकार्‍यांची बदली होणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विविध संघटनांनी दिला. यावेळी मॅग्मोचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, डॉ. रवींद्र दुर्गे, डॉ. संघर्ष राठोड, डॉ. महेश मनवर, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मनोजकुमार चौधर, राजेश कुळकर्णी, सोनाली माडकर, अरविंद गुडधे, मुख्याधिकारी संघटनेचे शेषराव टाले, सुनील बल्लाळ, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे दिलीप झाडे, डी. पी. बदकी, इ. व्ही. बिजवे, कुणाल झाल्टे, धीरज स्थूल यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, अधिकारी उपस्थित होते.


पाठिंबा देणार्‍या संघटना

महाराष्ट्र स्टेट मेडीकल टिचर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आदींनी मॅग्मोच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

 
‘बिहार’ची भाषा नको

जिल्हाधिकारी अधिकार्‍यांना बैठकीत अपमानित करतात. तासनतास कॅबिनबाहेर उभे ठेवतात. तोड दुंगा, फोड दुंगा अशा शब्दांचा वापर करीत असल्याचा आरोप अधिकार्‍यांनी आझाद मैदानातील सभेत केला. बिहारची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी दिला.

संपादन  : अतुल मांगे