गोदामातच सापडले बोगस बीटी बियाणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नागपूर : बोगस बीटी बियाण्यांची विक्री धडाक्‍यात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मौदा तालुक्‍यातील अडेगाव येथे छापा घालून 109 पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. सर्व पॅकेट येथील बंद शासकीय गोदामात ठेवून होती, हे विशेष. सिंचन विभागाचे हे गोदाम असल्याचे सूत्रांकडून समजते.

खरिपातील पेरणीचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. बोगस, अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बीटीचे बोगस बियाण्यांची विक्री वाढली आहे. बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी प्रवीण देशमुख यांनी तालुकास्तरावर भरारी पथक तयार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विभागाला मौदा तालुक्‍यातील अडेगाव येथे एका व्यक्तीकडून अवैध बीटीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आज दुपारच्या सुमारास छापा घालण्यात आला. येथील सिंचन विभागाच्या बंद गोदामात हे बीटी बियाण्यांचे पॅकेट ठेवून होते. यात 14 पॅकेट बिल्ला तर 95 पॅकेट अरुणोदय नावाचे असल्याची माहिती आहे. कृषी विभागाच्या पथकाने छापा घालताच गावात एकच खळबळ उडाली. श्री रघू याच्या मालकीचे हे पॅकेट असल्याचे सांगण्यात येते. कृषी विभागाने रघूच्या विरोधात मौदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी बुटीबोरी येथे 999 बोगस बीटी बियाणे पॅकेट मिळाले होते. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: duplicate Bt seeds found in the godown