यवतमाळमध्ये 150 पाकीट बोगस बियाणे जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा शिरकाव झाला होता. यंदाही बोगस बियाणे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोगस बियाणाला आळा घालण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. त्यासाठी यत्रंणा कामी लावली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
- राजेंद्र धोंगडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती.

यवतमाळ : शहरातून जाणार्‍या बोगस बियाण्यावर कृषी विभागाने कारवाई करीत तब्बल 100 पाकीट बियाणे जप्त केले. ही कारवाई आज (ता.19) सकाळी दहा वाजता कृषी विभागाच्या भरारी पथकाने अकोला बाजार-यवतमाळ मार्गावरील चापडोह पुनर्वसन वसाहत जवळ केली.

बोगस बी.टी. बियाण्याचा साठा घेऊन दोन तरुण दुचाकी जाणार असल्याची गोपनीय माहिती पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र धोंगडे यांना मिळाली. त्यांनी मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता नियत्रंण अधिकारी लितेश येळवे यांना सोबत घेऊन यवतमाळ-घाटंजी मार्गावरील चापडोह पुनर्वसन चौफुलवर दोन संशयित तरुण बोगस बियाणे घेऊन जात असल्याने दिसताच पथकाने त्यांना अडवीले. दोघांपैकी एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहीम अधिकारी पकंज बरडे यांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंकज भोयर (रा.यवतमाळ), अविनाश राठोड (रा. वडगाव गाढवे) त्यांना बोगस बियाण्याच्या पाकीटासह ताब्यात घेतले. त्यांचेकडून एटीएम ब्रॅण्ड नेम असलेले 50 तसेच आर. कॉट नावाचे 100 असे तब्बल 150 पाकीट जप्त केले. किंमत अंदाजीत एक लाख 11 हजार रुपयांचे बियाणे जप्त केले.

बियाणे पाकिटावर वेस्टन लेबल, त्यावरील मजकुर आदी बाबी पाहता शेतकर्‍यांची फसवणुक करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात बियाणे आणल्या गेले. पाकिटावर उत्पादक, विक्रेत्यांचा बनावट उल्लेख आढळून आला. विना परवाना कापूस बियाण्याची साठवणूक व विक्री केल्यामुळे  संबंधितावर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्यात आली. मागील चार दिवसात कृषी विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी घाटंजी तालुक्यात कृषी विभागाने 700 पाकीट बोगस बियाणे साठा जप्त केला होता. यावेळी कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र धोंगडे, मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता नियत्रंण अधिकारी लितेश येळवे आदी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात बियाणे जिल्ह्यात दाखल होत असल्याने पुन्हा एकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. 

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा शिरकाव झाला होता. यंदाही बोगस बियाणे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोगस बियाणाला आळा घालण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. त्यासाठी यत्रंणा कामी लावली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
- राजेंद्र धोंगडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती.

Web Title: duplicate seed seized in Yavatmal