वाह! टाळेबंदीचा काळ लागला सत्कर्मी; शासनाचा एक रुपया ही न घेता या गावकऱ्यांनी केली वाट मोकळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने टाळेबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग म्हणून मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील गावकर्‍यांनी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या पांदण रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. शासनाचा एक रुपया ही न घेता हे तीन किलोमीटरचा रस्ता गावकर्‍यांनी ग्रामपंचायत प्रशासन, भारतीय जैन संघटनेच्या मदतीने लोकसहभागातून पूर्ण केले.

वाशीम ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने टाळेबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग म्हणून मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील गावकर्‍यांनी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या पांदण रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. शासनाचा एक रुपया ही न घेता हे तीन किलोमीटरचा रस्ता गावकर्‍यांनी ग्रामपंचायत प्रशासन, भारतीय जैन संघटनेच्या मदतीने लोकसहभागातून पूर्ण केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तब्बल 1982 पासून मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील (आमराई) पांदण रस्ता पावसाळ्यात शेतात जाण्याच्या कामीच नसे. कारण, पावसाळ्यात या रस्त्यावर सर्वत्र पाणी व चिखल होत असल्यामुळे ये-जा करणे कठीण होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी व संचारबंदी लागू केली.

हेही वाचा - Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोना प्रवेश

या वेळेचा सदुपयोग म्हणून गावकर्‍यांनी या पांदण रस्त्याचे पुनर्भरण करण्याबाबत विचारविनिमय केला. तसेच याकरिता ग्रामपंचायत, गावातील सर्व शेतकरी व भारतीय जैन संघटना यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून या तीन किलोमीटर रस्ता कामाला सुरुवात केली. पाहता पाहता या रस्ता कामावर एकेक हात जोडत गेला. तसतसा रस्ता पाहता पाहता पूर्णत्वास आला आहे.

या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे, मालवाहतूक करणे आदी कामे सुलभ होणार आहेत. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी बांधव, गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी, भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत  मैराळडोह यांचे आभार मानले. सरपंच राधाबाई बंडुराव घुगे यांनी  गावातील सर्व पांदण रस्त्याच्या कामांची पाहणी केली. तसेच गावकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती. 

लॉकडाऊनचा पूर्ण फायदा
लॉकडाऊनचा पूर्ण फायदा घेत, मैराळडोह ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोक सहभागातून पांदण रस्त्याचे निर्माण कार्य सुरू आहे. तीन किलोमीटर अंतराचा हा रस्ता शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता, गावकरी व भारतीय जैन संघटना यांच्या पुढाकारातून सुरू आहे.
-राधाबाई बंडुराव घुगे, सरपंच, ग्रामपंचायत मैराळडोह, ता. मालेगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the lockout period, good deeds, villagers built a three kilometre road