
कोरोनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांना व्यवसाय बंद करावे लागले, तर काहींची खासगी नोकरीही गेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाइन वर्गांवर भर देण्यात येत आहे. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून पालकांकडे शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरोधात शिक्षण विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - कुणी तरी येणार येणार गं ! थाटामाटात पार पडलं श्वानाचं डोहाळे जेवण; नागपुरातील पोलिस...
कोरोनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांना व्यवसाय बंद करावे लागले, तर काहींची खासगी नोकरीही गेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च करताना पालकांना चांगलीच कसरत करावी लागते. जिल्हा परिषदेच्या शाळा असताना बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल चांगलाच वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची जास्त शुल्क असली तरी दर्जेदार शिक्षण मिळते, या समजुतीमुळे पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात. कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. केवळ शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय ठेवला.
हेही वाचा - रहीमभाई अन् कावळ्यांची अनोखी मैत्री; हॉर्न वाजताच जमतो थवा, अंगाखांद्यावर खेळल्यानंतर...
शाळांनी पालकांकडे सक्तीच्या शुल्क वसुलीसाठी तगादा लावला. शुल्क भरले नाही, म्हणून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे बंद केल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणितहित लक्षात घेता शाळांच्या या कृतीवर शिक्षण विभागाने आक्षेप घेतला आहे. शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविणे बंद करण्यात येऊ नये, वर्ग सुरू असताना काही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांना कळविण्यात यावे, कोणत्याही विद्यार्थ्याला ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, तसे केल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात येईल, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शाळा संस्थालकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. काही शाळांकडून शुल्क वसुलीसाठी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह खासगी स्वयंअर्थ सहाय्य शाळांच्या मुख्याध्यपकांना पत्र पाठविण्यात आले आहे.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. यवतमाळ.