वाळूतस्करांची वाढली हिंमत, प्रशासनाने आवळल्या मुसक्या; केली सर्वांत मोठी कारवाई  

सूरज पाटील
Monday, 7 December 2020

जिल्ह्यातील वाळूघाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. असे असले तरी चोरमार्गाने शहरात वाळूची वाहतूक सुरू आहे. घाटावरून वाळूचा उपसा सुरूच आहे. वाळू चोरट्यांविरोधात महसूल प्रशासन आक्रमक झाले आहे. शहरात येणाऱ्या वाळू वाहनाविरोधात नाकाबंदी सुरू केली.

यवतमाळ  : वाळूचा अवैधपणे उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले आहे. बाभूळगाव, कळंब तसेच अकोलाबाजार मार्ग शहरात येणारे वाळूचे आठ ट्रक उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांच्या पथकाने पकडले. तसेच जवळपास 17 लाखांचा दंड वाहनचालकांना ठोठावला आहे.

जिल्ह्यातील वाळूघाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. असे असले तरी चोरमार्गाने शहरात वाळूची वाहतूक सुरू आहे. घाटावरून वाळूचा उपसा सुरूच आहे. वाळू चोरट्यांविरोधात महसूल प्रशासन आक्रमक झाले आहे. शहरात येणाऱ्या वाळू वाहनाविरोधात नाकाबंदी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून शहरात येणाऱ्या वाळूसाठा जप्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच तहसीलदारांनी वाळू घेऊन जाणारे ट्रक पकडले होते. तेव्हापासून कारवाई सुरूच आहे. 

क्लिक करा - बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या
 

रविवारी शहरात बाभूळगाव, अकोलाबाजार तसेच आर्णी मार्गाने वाळू घेऊन ट्रक येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी तसेच तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या नेतृत्वात दोन पथक तयार करण्यात आले. दोन्ही पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. यात तब्बल आठ ट्रक जप्त करण्यात आले. त्यांना प्रत्येकी एक लाख 55 हजार प्रमाणे जवळपास 17 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 

या वाहनातून जवळपास 24 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या कारवाईत एमएच 31 सीक्‍यू 7491, एमएच 40एन 1629, एमएच 04 एफएल 5528, एमएच29 बीई 7075, एमएच 31 सीक्‍यू 9286, एमएच 40 एन 1199, एमएच 40 7456, एमएच 29 बीई 0019 या क्रंमाकांचे आठ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या पथकात नायब तहसीलदार राजेश सहारे, गणेश तेलेवार, उमेश बेंद्रे, महेश चौधरी, मंगेश थोरात, मारोती कुळसंगे, अतुल खोब्रागडे, शरद गावंडे, अंकुश शिवणकर, नितीन ठाकरे आदींचा समावेश होता.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
 

आतापर्यंतची मोठी कारवाई

वाळू चोरट्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. यापूर्वीही अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, गेल्या काही महिन्यांतील आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांनी शहरात येणारे आठ ट्रक पकडण्यात आले. त्यामुळे महसूल प्रशासनाने वाळू चोरट्यांच्या मुसक्‍या आवळल्याचे दिसून येत आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight sand smuggling trucks seized in Yavatmal district