आठ वर्षीय मुलाचा तब्बल तीनशे किमीचा प्रवास 

भंडारा : रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह धनू गोड व मुलगा कौशल
भंडारा : रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह धनू गोड व मुलगा कौशल

वरठी (जि. भंडारा) : नाव कौशल धनू गोड... वय वर्षे अवघे आठ... राहणार छत्तीसगड राज्यातील बडोदा बाजार जिल्ह्यातील कामता तालुक्‍यातील नवागाव... वडील परराज्यात कामाला आहे. त्यामुळे महिनोमहिने भेट होत नाही. वडिलांच्या आठवणीने तो बेजार झाला होता. वडिलांना भेटायचेच अशी गाठ त्याने मनाशी बांधली होती. त्यामुळे तब्बल तीनशे किलोमीटरचा प्रवास करून थेट भंडरा गाठले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने पिता-पुत्राची भेट झाली. ही घटना भंडारा रोड (वरठी) येथे उघडकीस आली. 

छत्तीसगड राज्यातील बडोदा बाजार जिल्ह्यातील नवागाव (ता. कामता) येथील धनू गोड रोजीरोटी मिळावी म्हणून कामाच्या शोधात वर्धा जिल्हातील जामगाव येथे आले. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगी कुंती व आठ वर्षांचा मुलगा कौशल आहेत. कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी कमाई करण्यास परप्रांतात आलेले धनू गोड दिवाळीलासुद्धा 
गावाकडे जाऊ शकला नाही. तिकडे चिमुकला कौशल वडिलांच्या आठवणीने कासावीस झाला होता. 

दिवसरात्र वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या कौशल आपणच त्यांच्या भेटीला जायचे असा विचार करू लागला; पण साधन नव्हते. त्याने गुरुवारी शाळेत आल्यावर दप्तर ठेवले व गावातील रेल्वे स्टेशनवरून छत्तीसगड एक्‍सप्रेसमध्ये बसून वर्धा येथे जाण्यास निघाला.

गाडीतील एस-2 बोगीमध्ये बसलेल्या मुलाबाबत रेल्वेच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना संशय निर्माण झाला. नागपूर नियंत्रण कक्षाने भंडारा रोड स्टेशनमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना सूचना देऊन येत असलेल्या छत्तीसगड एक्‍सप्रेसमधील एस-2 बोगीत सिट क्रमांक 17 से 20 तपासण्याचे निर्देश दिले. 

त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक विभा औतकर, आरक्षक उत्तम कगाले, विनोद चामलाटे यांनी येथील स्टेशनमध्ये गाडी येताच संबंधित बोगीत असलेल्या मुलाला विचारपूस केली. त्याने कौशल धनू गोड (वय आठ, रा. नवागाय, जि. बडोदा बाजार) अशी माहिती दिली.

अधिक माहिती विचारली तेव्हा त्याने सांगितले, त्याचे वडील वर्धा जिल्ह्यातील जामगाव येथे कामासाठी गेले आहे. त्यांची खूप आठवण आल्यामुळे शाळेतच दप्तर ठेऊन रेल्वे गाडीत बसल्याचे सांगितले. त्याच्याकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. 

धनू यांनी मानले आभार 
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कौशलची आस्थेने विचारपूस केली असता त्याने बहीण कुती गोड हिचा मोबाईल नंबर दिला. अधिकाऱ्यांनी मुलाच्या बहिणीसोबत संपर्क साधून वडील धनू गोड यांचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांना दुसऱ्या दिवशी विदर्भ एक्‍सप्रेसने भंडारा रोड येथे बोलावून घेतले. धनू गोड भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर आले. त्यांची साक्षदारासमोर विचारपूस करून आधार कार्डच्या आधारे खात्री केल्यावर कौशलला स्वाधीन करण्यात आले. धनू गोड यांनी रेल्वे पोलिस व अधिकाऱ्यांचे आभार मानले व कौशलसोबत गावाकडे रवाना झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com