यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजले बिगुल, ९८० गावांत रंगणार सामना

election of 980 grampanchayat will held on 15 january in yavatmal
election of 980 grampanchayat will held on 15 january in yavatmal

यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हिवाळ्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींत निवडणुकीचा फड रंगणार आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार असून, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार एक डिसेंबरला ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत (ता.सात) त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार सोमवारी (ता.14) अंतिम मतदारयादी प्रसिद्घ करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार विहित मुदतीत निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ग्रामपंचायतीत आपलाच पक्ष व गटाची सत्ता यावी, यासाठी मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू झाली होती. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

असा राहील निवडणुकीचा टप्पा -
मंगळवारी (ता.15) निवडणुकीची नोटीस प्रसिद्घ करण्यात येईल. बुधवार 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करता येणार आहे. 31 डिसेंबरला नामनिर्देशपत्रांची छाननी करण्यात येईल. चार जानेवारी 2021ला नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून, निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्घ करण्यात येईल. आवश्यक असल्यास 15 जानेवारीला मतदान घेण्यात येईल. 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार असून, 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्घ करण्यात येईल.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या -
यवतमाळ 67, कळंब 59, बाभूळगाव 55, आर्णी 66, दारव्हा 76, दिग्रस 48, नेर 50, पुसद 105, उमरखेड 85, महागाव 73, केळापूर 45, घाटंजी 50, राळेगाव 48, वणी 82, मारेगाव 31, झरी 41.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com