चतुर्वेदी-राऊत गटात पुन्हा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर : निलंबन वापसीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या खेम्यात परतू लागल्याने मुत्तेमवार-ठाकरे गट अस्वस्थ असल्याचे कळते.

नागपूर : निलंबन वापसीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या खेम्यात परतू लागल्याने मुत्तेमवार-ठाकरे गट अस्वस्थ असल्याचे कळते.
महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले नसल्याने चतुर्वेदी नाराज झाले होते. त्यामुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार तसेच शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी उघड पंगा घेतला होता. त्यांच्या समर्थकांनी अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करून आपला रोष व्यक्त केला होता. तेव्हापासूनच शहर कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. चतुर्वेदी-नितीन राऊत-अनीस अहमद यांचा गट निर्माण झाला होता. सातत्याने पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने अशोक चव्हाण यांच्या तक्रारीवरून चतुर्वेदी यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होताच त्यांनी चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द केले. सोबतच नितीन राऊत यांना कॉंग्रेसने प्रदेशचे कार्याध्यक्ष केले आहे. त्यामुळे आता चतुर्वेदी-राऊत गटाचे वजन कॉंग्रेसमध्ये वाढत चालले असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश बदलल्यानंतर ठाकरे गटाची दिल्ली लिंक कमजोर झाली आहे. याचा फायदा घेऊन चतुर्वेदी-राऊत पुन्हा सक्रिय झाले आहेत. यासोबत विकास ठाकरे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पक्षांतर्गत विरोधक यास आणखी हवा देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ठाकरे गेल्यानंतर आपल्याला कोण विचारणार, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेकांनी राजकीय सोयीचा मार्ग निवडला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election, chaturvedi and raut