निवडणुकीची उत्सुकता शिगेला : महाविकासआघाडी विरुद्ध विकास आघाडीचा सामना

Election of District Central Co operative Bank in Yavatmal District
Election of District Central Co operative Bank in Yavatmal District

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची तारीख अजूनही निश्‍चित झालेली नाही. परिणामी, निवडणूक रिंगणातील उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या बॅंकेच्या निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध शेतकरी सहकार विकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. सहकार विकास आघाडीने मेळाव्यांच्या माध्यमातून आपले शक्तीप्रदर्शन सुरू केले असून, महाविकास आघाडीनेही प्रचारावर भर दिला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला तब्बल १३ वर्षांनंतर मुहूर्त मिळाला होता. मार्च महिन्यात मतदान होणार होते. त्यानुसार तालुका व जिल्हा गटात उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, ९७व्या घटना दुरुस्तीमुळे बॅंकेचे संचालक मंडळ कमी करण्यात आले. संचालक मंडळाची संख्या २१ निश्‍चित करण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यात उमेदवारी देण्यावरून चांगलीच कसरत झाली.

राज्यात सत्तासमीकरण बदलले. त्यामुळे निवडणुकीत प्रचारापूर्वीच रणधुमाळी सुरू झाली. निवडणुकीसाठी नामांकन दाखल केल्यानंतर पुसद व उमरखेड तालुका गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा फॉम्युला बॅंकेच्या निवडणुकीत कायम ठेवल्याने काहींचा पत्ता कट झाला. त्यावरून नाराजांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर भाजपप्रणित सहकार विकास आघाडी तयार करण्यात आली.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीत डावलण्यात आलेल्यांना संधी देण्यात आली. कोरोनामुळे बॅंकेच्या निवडणुकाही तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. आता मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दोन ते तीन वेळा नियोजनाचा प्रस्ताव प्राधिकरणाला गेला. मात्र, अजूनही अधिकृत तारीख निश्‍चित न झाल्याने उमेदवारांत संभ्रमावस्था आहे.

भेटीगाठींवर जोर

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यंदा तगडी लढत होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून मतदारांना हेरणे सुरू आहे. निवडणुकीची तारीख निश्‍चित नसली तरी प्रचार थांबलेला नाही. सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. ऐनवेळी कार्यक्रम लागल्यास तयारी असावी, म्हणून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com