शुक्रवारपासून धावणार इलेक्‍ट्रिक कॅब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

देशात पहिला प्रयोग - चार ठिकाणी स्टेशन

देशात पहिला प्रयोग - चार ठिकाणी स्टेशन
नागपूर - ओला कंपनीतर्फे देशभरात इलेक्‍ट्रिक कॅब, बस, ऑटो रिक्षा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रारंभ नागपुरातून होत असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 26) या सेवेचा शुभारंभ होत असल्याचे कंपनीचे विपणन संचालक आनंद सुब्रमण्यम यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. या सेवेसाठी कंपनीने पन्नास कोटींची गुंतवणूक केली आहे.

प्रदूषण ही भविष्यातील सर्वांत मोठी समस्या होणार आहे. त्यावर आतापासून आळा घालणे आवश्‍यक आहे, अन्यथा येणाऱ्या पिढीला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. याकरिता प्रदूषणविरहित इलेक्‍ट्रिक कॅब सुरू केल्या जात आहेत. याची सुरुवात येत्या 26 मेपासून नागपूर येथून केली जाणार आहे. इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिंगकरिता चार भागात स्टेशन आणि 40 ते 50 चार्जिंग पॉइंट असतील. ग्राहकांना दर्जेदार सुविधा मिळावी, इलेक्‍ट्रिक कॅब वाहनांना कुठली अडचण येऊ नये यासाठी महिंद्रा, टाटा, बी वायडी, कायनेक्‍टिक, टीव्हीएस, निसान यांसारख्या कंपन्यांशी ओलाने करार केला आहे. या कंपन्याकडून तांत्रिक सेवा घेतली जाणार आहे.

मेट्रोची मदतच होणार
मेट्रोचा या कॅब सेवेवर कुठलाही परिणाम होणार असून उलट त्याची मदत होईल. नागपूर एक औद्योगिक शहर म्हणून पुढे येत आहे. मिहान, आयआयटी, मोठी विद्यापीठे, पंतजलीसारखे अनेक मोठी उद्योग येथे येत आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्याची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे तेवढीच दर्जेदार वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. ही विकास कामे कॅब सेवेसाठी पूरक आहेत, असे सुब्रमण्यम म्हणाले.

स्थानिकांना रोजगार
सध्या नागपुरात ओलाच्या 3 हजार कॅब धावत आहेत. आता दोनशे इलेक्‍ट्रिक कॅब सुरू होणार आहेत. यासाठी चालक आणि तांत्रिक स्टाफची गरज भासणार असून यातून स्थानिकांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. "फ्रॉम द सिटी, फॉर द सिटी' हे ओलाचे धोरण असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Web Title: electric cab on road at friday