इलेक्‍ट्रिकल व्हेईकल हाच पर्याय : उदयन पाठक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

इलेक्‍ट्रिकल व्हेईकलचा वापर वाढावा यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जवळपास पंधरा हजारांवर चारचाकी वाहने आणि नव्या बस महानगरांमध्ये वापरल्या जाणार आहेत. लवकरच मुंबई-पुणे, लखनौ-कानपूर दरम्यान इंटरसिटी इलेक्‍ट्रिक बसेस चालवल्या जाऊ शकतात. या वाहनांसाठी सरकारकडून सवलती मिळत आहे.

नागपूर : नैसर्गिक संसाधनांची मर्यादा लक्षात घेता इलेक्‍ट्रिकल व्हेईकल हेच भविष्यातील वाहन ठरणार आहे. त्यातही विजेचा वापर कमीतकमी करण्यासाठी सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग स्टेशन तयार करण्यावर आता भर दिला जात असल्याची माहिती ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार आणि टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक उदयन पाठक यांनी आज येथे दिली.

हे वाचाच - आमटे आठवडा म्हणजे काय, माहिती आहे काय?

रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. इलेक्‍ट्रिकल व्हेईकलचा वापर वाढावा यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जवळपास पंधरा हजारांवर चारचाकी वाहने आणि नव्या बस महानगरांमध्ये वापरल्या जाणार आहेत. लवकरच मुंबई-पुणे, लखनौ-कानपूर दरम्यान इंटरसिटी इलेक्‍ट्रिक बसेस चालवल्या जाऊ शकतात. या वाहनांसाठी सरकारकडून सवलती मिळत आहे. मात्र, बॅटरी चार्जिंग हीच मोठी समस्या आहे. शहरांमध्ये चार्जिंगची बऱ्यापैकी व्यवस्था होऊ शकते. मात्र, लांबच्या प्रवासासाठी अधिकाधिक चार्जिंग पॉइंटचे नेटवर्क उभे करण्याची गरज आहे.

दुसरीकडे बॅटरी दीर्घकाळ टिकावी, यासाठी त्यातील एनर्जी वाचविण्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून "मेकॅनिकल लॉक' यासारख्या पर्यायाचा शोध घेणे सुरू आहे. तसेच भविष्यात विविध सेंटरवर बॅटरी सहजरित्या बदलण्याची सोय उपलब्ध करणे यासारखेही पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या वाहनांना इलेक्‍ट्रिकल व्हेईकल हाच पर्याय असून विविध कंपन्या त्यावर संशोधन करीत आहेत. ही वाहने वापरासाठी अधिक सोयीची करण्यावर भर देण्यात येत आहे. या वाहनांची किंमत तुलनेने अधिक वाटत असली तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यास या वाहनांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Vehicle is the only option: Udayan Pathak