वीज कामगारांचा आजपासून संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

यवतमाळ - "समान काम, समान वेतन' या मुख्य मागणीसह अन्य मागण्या कंत्राटी वीज कामगारांच्या आहेत. अजूनही या मागण्यांसंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंगळवारी (ता.23 ) कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपात राज्यातील जवळपास 32 हजार कामगार सहभागी झालेले आहेत. मागण्यांवर लवकरच तोडगा न निघाल्यास येणाऱ्या दिवसांत वीजनिर्मितीवर संपाचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीन कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यात समान काम, समान वेतन, आठ दहा वर्षांतील ज्येष्ठता यादी तयार करून ज्येष्ठ कंत्राटी कामगारांना कायम करणे, कंत्राटदार बदलले तरी कामगारांना कमी न करता त्यांनाच कामावर घेणे अशा मागण्या आहेत. यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर मनोज रानडे समिती स्थापन केली होती. समितीने शासनाला अहवाल दिला. परंतु, त्यावर चर्चा नाही. त्यानंतर पुन्हा अनुराधा भाटिया समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांना सहा मार्च 2017पर्यंत अहवाल सादर करावयाचा होता. मात्र, अजूनही अहवाल सादर झालेला नसल्याचा आरोप वीज कामगार कृती समितीने केला आहे.

Web Title: electricity employee strike