कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने ग्राहक हैराण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

देवरी तालुक्‍यातील ग्रामीण जीवन संकटात
देवरी - डोक्‍यावर आग ओकणारा सूर्य, घरात पाण्याची चणचण, कृषिपंप असून शेतीला पाणी नाही, उद्योगाचे तरं काही खरं नाही, डोळ्याला शांत झोप नाही, अशी कृत्रिम अवस्था या उन्हाळ्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तालुक्‍यात निर्माण केली. 

देवरी तालुक्‍यातील ग्रामीण जीवन संकटात
देवरी - डोक्‍यावर आग ओकणारा सूर्य, घरात पाण्याची चणचण, कृषिपंप असून शेतीला पाणी नाही, उद्योगाचे तरं काही खरं नाही, डोळ्याला शांत झोप नाही, अशी कृत्रिम अवस्था या उन्हाळ्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तालुक्‍यात निर्माण केली. 

देवरी तालुका हा अतिदुर्गम, जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्‍यात उद्योगांची वानवा आहे. नागरिकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती. शेतीत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहिरी खोदल्या. काहींनी तर नदीनाल्यापासून पाइपलाइनद्वारे सिंचनाची सोय केली. अनेकांनी कर्ज काढून शेतात विंधन विहिरीसुद्धा खोदल्या. वीज मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी वीज वितरण  कंपनीचे उंबरठे झिजविले. अनेक महिने-वर्षे हेलपाटा खाऊनही वीजपुरवठा होत नव्हता. आतातर वीजपुरवठ्याच्या नावावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिकडे-तिकडे रोहित्र बसविण्याचा सपाटा लावला.

कंत्राटदार आणि अधिकारी शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्याच्या नावाआड दिवाळी साजरी करीत आहेत. गावागावांत विद्युतीकरणाचा देखावा करून आता शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिल्याचा कांगावा वीज वितरण कंपनी करीत आहे. विजेचे खांब उभे झाले, तारा टाकल्या गेल्या, वीजमीटरही बसविले गेले; पण विजेचा पत्ता नाही. असली तरी उपयोग नाही. कमी दाबामुळे  अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी जळण्याची बोंब आहे. पाचपाच मिनिटांनी मोटार बंद पडते. असे असले तरी, वीज वितरण कंपनी वीजमीटरचे वाचन न करता भरमसाट वीजबिल मात्र पाठवत  आहे. कर्मचारी वीजपुरवठा कापण्याची धमकी देऊन सक्तीने वसुली करीत असल्याचा आरोप नेहमीचाच झाला आहे. पैसे घेतले तर जातात; पण अनेकांना त्याची पावती दिली जात नाही. मागणी केली तर अनेक दिवसांनी कमी रकमेची पावती देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. प्रत्यक्ष मीटरवाचन करून आणि मीटर अद्ययावत केल्यास शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचे बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही. 

अचानक कोणाचे बिल ६० हजारांवरून १० हजारावर येते तर काहींना थकबाकी नसताना वा कमी असताना ७० हजारांपर्यंत बिल दिले जाते. यावरून या प्रकारात काहीतरी घोळ असल्याचे संशय बळावत चालला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराचे मूल्यांकन करून वीजबिल देण्याची मागणी हळूहळू जोर धरू पाहत आहे. 

एकीकडे असला प्रकार होत असताना दुसरीकडे उद्योगाचेही काही खरे नाही. अत्यंत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने ग्रामीण भागातील उद्योगसुद्धा डबघाईस येत आहेत. असे असताना या ग्राहकांकडून वीजबिल सक्तीने वसूल केले जाते. म्हणजे सुमार दर्जाची सेवा असूनही बिल मात्र पूर्ण. यामुळे उद्योग तोट्यात चालले आहेत.
 

घरगुती वस्तूंचे  नुकसान
घरगुती वापराचे बोलायचे झाल्यास घरगुती पाण्याचे पंपसुद्धा व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत आहे. तंत्रज्ञानामुळे कमी वॉटचे दिवे आल्याने तेवढे बरे आहे. कमी दाबातसुद्धा प्रकाशाच्या प्रश्‍न तेवढा गंभीर नाही. पण, विजेच्या लपंडावाने या दिव्यांचे जीवनमानसुद्धा धोक्‍यात येत आहे. वीजमंडळाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी थोडा वेळ काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: electricity supply low pressure