मुसळधार पाऊस, चिखलात रुतलेला हत्ती, मृत्युशी झुंज आणि अखेर...

hatti.
hatti.

अहेरी (जि.गडचिरोली) : गडचिरोली जिल्हा निर्सग संपदेने परिपूर्ण आहे. जंगल आणि वनांनी समृद्ध असलेल्या या भागात वन्य प्राणीही विपूल प्रमाणात आहेत. कमलापूर येथे हत्तींचा निवास आहे. निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील
एका चार वर्षांच्या आदित्य नावाच्या हत्तीचा सोमवारी (ता.29) पहाटे मृत्यू झाल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा वनविभागाअंतर्गत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रात हत्ती कॅम्प आहे. येथे दहा हत्ती असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या अमानुष हत्येनंतर निसर्ग आपदेमुळे चिखलात रुतलेल्या चार वर्षाच्या हत्तीच्या मृत्युने वन्यजीव प्रेमी हळहळत आहेत.

कमलापूर येथे 10 जूनला मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी "आदित्य" परिसरात फेरफटका मारत असताना तो चिखलात अडकला. याबाबतची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला चिखलातून बाहेर काढले. त्याच्यावर अहेरी येथील व स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केले. मात्र, चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात "आदित्य" खूप थकलेला आणि घाबरलेला होता. वनविभागाने त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू केले. या दरम्यान आदित्यने खाणेपिणे सोडून दिले. तो उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने दिवसागणिक त्याची प्रकृती खालावत गेली.

अखेर सोमवारी (ता. 29) पहाटे आदित्यने अखेरचा श्‍वास घेतला. वनविभागाने योग्य वेळी लक्ष देऊन तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून उपचार करून घेतले असते तर आदित्यचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांत व्यक्त केली जात आहे. आदित्यच्या मृत्यूबाबत योग्य चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कमलापूर येथील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

योग्य औषधोपचार केले
अचानक पाऊस आल्याने जंगलात "आदित्य" नावाचे हत्तीचे पिल्लू चिखलात फसले होते. त्याला चिखलातून बाहेर काढून त्याच्यावर औषधोपचार सुरू होता. दररोज त्याला दहा ते बारा सलाईन लावल्या जात होत्या. वनविभागाकडून त्याची पूर्ण काळजी घेण्यात आली. मात्र, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
श्री. घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com