बदली कर्मचारी ठाण मांडून; तरीही होणार कार्यशाळा..वाचा सविस्तर   

मुनेश्‍वर कुकडे 
Tuesday, 21 July 2020

कर्मचाऱ्यांना बदलीस्थळी रुजू होणे गरजेचे आहे. मात्र, तसे झाले नाही. अनेकजण अजूनही जुन्याच जागी ठाण मांडून आहेत. असे असतानाच सार्वत्रिक बदल्यांची कार्यशाळा 22 जुलै रोजी आयोजित केली आहे. 

गोंदिया ः जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना बदलीस्थळी रुजू होणे गरजेचे आहे. मात्र, तसे झाले नाही. अनेकजण अजूनही जुन्याच जागी ठाण मांडून आहेत. असे असतानाच सार्वत्रिक बदल्यांची कार्यशाळा 22 जुलै रोजी आयोजित केली आहे. 

या सगळ्या प्रकारावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, नव्या कर्मचाऱ्यांना कार्यभार सोपविण्यास हा विभाग मागेपुढे पाहात आहे. 

हेही वाचा-  काय हे नशीब! घोडे, श्‍वान, बकरेही करतात रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास

कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत विभागातील वरिष्ठ सहायक यांची गोरेगाव पंचायत समिती येथे बदली झाली आहे. त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागात असलेल्या एका कर्मचाऱ्याची सडक अर्जुनी पंचायत समिती येथे बदली, तर बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याची बदली लघू पाटबंधारे उपविभाग सालेकसा येथे, सालेकसा येथील लघू पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याची बदली बांधकाम विभाग जिल्हा परिषदेत झाली आहे. या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे कार्यमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, अधिकारी त्यांना कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. 

तातडीने कार्यमुक्त करा 

दरम्यान, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागामार्फत 31 मे 2018 रोजी झालेल्या बदल्यांमधील काही कर्मचारी अद्यापही कार्यमुक्त न झाल्याने यावेळी होऊ घातलेल्या बदल्यांमध्ये ते त्या ठिकाणी रुजू न झाल्याने अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, असे बोलले जात आहे. बुधवार, 22 जुलै रोजी बदल्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेतही नाराजांच्या संतापाचा बांध फुटणार आहे. 

नक्की वाचा - मोठी बातमी : दारू विक्रेत्याचा पोलिसांवर तलवारीने हल्ला  

तत्काळ बदलीस्थळी पाठविणार 
99 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून बदलीस्थळी जाण्यास सांगितले आहे. काही कर्मचारी आपली प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जुन्याच जागी आहेत. त्यांना आता अधिक काळ रोखले जाणार नाही. तत्काळ बदलीस्थळी पाठविले जाईल. 
- नरेश भांडारकर ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद (सामान्य प्रशासन) गोंदिया. 
 

 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employees of district council are not ready to go to their transfer places