बहुपीक मळणीयंत्रणातून मिळाला रोजगार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

कन्हान, ता. 24 : पारशिवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात खेडी (खोपडी) येथील युवा शेतकऱ्याला बहुपीक मळणीयंत्र घेण्यास शासनाव्दारे 50 टक्‍के अनुदान मिळाल्याने युवा शेतकरी राजू इंगळे यांना शेतीवर आधारित रोजगार उपलब्ध झाला. कृषी अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्‍त केले.

कन्हान, ता. 24 : पारशिवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात खेडी (खोपडी) येथील युवा शेतकऱ्याला बहुपीक मळणीयंत्र घेण्यास शासनाव्दारे 50 टक्‍के अनुदान मिळाल्याने युवा शेतकरी राजू इंगळे यांना शेतीवर आधारित रोजगार उपलब्ध झाला. कृषी अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्‍त केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सोयाबीन 2018-19 अंतर्गत बहुपीक मळणीयंत्र तालुका कृषी अधिकारी डॉ. ए. टी. गच्छे, मंडळ कृषी अधिकारी जी. बी. वाघ, कृषी पर्यवेक्षक श्रीमती एम. ए. थेरे, कृषिसेवक जे. के. शेख यांच्या मार्गदर्शनात व शिफारशीने खेडी (खोपडी) येथील युवा शेतकरी राजू सेवकराम इंगळे यांनी बहुपीक मळणीयंत्र 2 लाख 10 हजार रुपयांत विकत घेतले. शासनाव्दारे त्यांना 50 टक्‍के अनुदान मिळाले. त्यातून जीएसटीची रक्कम कपात करून राजूच्या बॅंक खात्यात 75 हजार रुपये अनुदान म्हणून जमा झाले. यामुळे शेतीयंत्रावरसुद्धा जीएसटी घेण्यात येत असल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्‍त केली. पारशिवनी तालुक्‍याच्या खेडी गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धान पिकांची लागवड असल्याने हे मळणीयंत्र डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आल्याने या यंत्राचे शेतकऱ्यांना धान मळणीस सहकार्य होऊन मळणीयंत्र घेतल्यापासून एक हजार धान बोऱ्याची मळणी करून 1 लाख 20 हजार रुपये मिळाले. खर्च वजा करता 80 हजार रुपयांचा नफा होऊन युवा शेतकऱ्यासह 10 मजुरांनासुद्धा याचा लाभ मिळाला. तालुक्‍यातसुद्धा या मळणीयंत्राची मागणी वाढलेली आहे. या मळणीयंत्राचा युवा शेतकऱ्याला आर्थिक फायदा तर झालाच; सोबत मळणीयंत्रावर 10 बेरोजगारांना काम मिळाले. शेतीआधारित रोजगार उपलब्ध होऊन युवा शेतकरी राजू इंगळे यास उन्नतीचे किरण दिसू लागले. त्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्‍त केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment from pollution mill