उर अभिमानाने येणार भरून; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृद्धाने आयुष्याची जमापुंजी केली अर्पण

The entire money spent on shaping the younger generation
The entire money spent on shaping the younger generation

अमरावती : आयुष्यभर कष्ट करून मिळविलेली जमापुंजी वार्धक्याच्या काळात कामी येईल, या विचाराने सर्वसामान्य व्यक्ती जास्तीत जास्त संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतो. मात्र, जगावेगळा विचार करून आपल्याच नव्हे तर येणाऱ्या पिढीच्या आयुष्याचे सोने करणारेसुद्धा या भूमीत आहेत. त्यांनी अनेकांचे आयुष्यच नव्हे तर संसारसुद्धा रुळावर आणले. अशाच एका भूमिपुत्राने आपल्या आयुष्याची जमापुंजी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्पण केली आहे. दलितमित्र मधुकरराव अभ्यंकर (७७) असे त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेले मधुकरराव अभ्यंकर यांनी शिक्षण, क्रीडा, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत केलेले कार्य प्रचंड मोठे आहे. जोपर्यंत माणसाची चलती असते तोपर्यंत सर्वांची सोबत असते, पडती आली म्हणजे कोणी साथ देत नाही, असे बोलले जाते. मात्र, ज्यांची बाजू कमकुवत आहे त्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याच्या विचारातूनच मधुकरराव अभ्यंकर यांनी एक वेगळाच निर्णय घेतला.

गरिबांच्या मुलांसाठी एक चांगली अकादमी असावी, असा विचार त्यांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून पक्का झाला होता. अकादमी सर्व सोयींनी सज्ज असावी. त्यात ग्रंथालय, राहण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हॉल असावा, असा विचार करीत त्यांनी जागेचा शोध सुरू केला. महादेवखोरीच्या जवळ पोहरा जंगलाच्या पायथ्याशी निसर्गरम्य अशा अजिंठा कॉलनीत ती जागा निश्चित झाली.

अकादमीसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हताच. कारण, आयुष्याची जमापुंजी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी लावण्याचा निश्चय त्यांनी आधीच केला होता. विमा पॉलिसी, बँकेतील फिस्क डिपॉझिट त्यांनी तोडले. जेवढा पैसा जमा होता तो याच कामी लावला. एवढेच नव्हे तर चार एकर शेतीसुद्धा त्यांनी विकली.

आपण या जगात नसलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार नव्या पिढीच्या मनात रुजावा, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण व्हाव्यात, सामाजिक जाणीवेतून त्यांनी पुढे जावे, आपल्या जिल्ह्यातील मुले यूपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या माध्यमाने पुढे जावीत, त्यांच्या आयुष्याला आकार मिळावा यासाठी मधुकरराव अभ्यंकर यांनी उचललेले हे पाऊल अमरावतीकरांचा उर अभिमानाने भरून यावा, असेच आहे.

समाजाच्या उत्थानासाठी जीवन समर्पित

जिल्हा परिषदेत तब्बल १७ वर्षे प्रतिनिधित्व केल्यावर सुद्धा आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या या व्यक्तीने समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. शहरापासून तर मेळघाटच्या दुर्गम भागापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे कार्य मधुकरराव अभ्यंकर यांनी केले.

युवकांच्या आयुष्याला आकार देणार

राहुल व्यायाम प्रसारक मंडळ व भूमिपुत्र शिक्षण संस्थेच्या माध्यमाने आजवर शेकडो विद्यार्थी घडविणारे मधुकरराव अभ्यंकर यांनी आता या अकादमीच्या माध्यमाने युवकांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या एका हक्काच्या ठिकाणाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com