एमआयडीसीतील कचऱ्याला उद्योजकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

यवतमाळ : शहरातील कचरा औद्योगिक वसाहतीत वाहनाने नेऊन टाकला जात आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. कचरा पेटविल्यामुळे कामगार व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणे बंद न केल्यास वाहने अडविण्यात येईल, असा इशारा एमआयडीसी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिला.

येथील विश्रामगृहात सोमवारी (ता.26) आयोजित पत्रकार परिषदेत सुराणा बोलत होते. एमआयडीसीत 70 उद्योग कार्यरत आहेत. परिसरात शाळादेखील आहे. विद्यार्थी व कर्मचारी मिळून जवळपास सहा हजार जनतेचा वावर आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कचरा पेटविल्याने धूर कंपनीसह शाळेत जातो. त्यामुळे पालकांनीदेखील रोष व्यक्त केला आहे. एमआयडीसीत कचरा न टाकता गावापासून दूर सुरक्षित ठिकाणी टाकण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तीन ऑगस्टपासून कचरा टाकण्यात येत आहे. सातत्याने प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. मात्र, केवळ आश्‍वासन देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोप सचिन आनंद भुसारी यांनी केला. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसी प्रशासनाने कचरा टाकण्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. प्रदूषण नियंत्रण विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. नियमानुसार एमआयडीसीत कचरा टाकता येत नाही, तरीदेखील हा प्रकार सुरू असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. पोलिस प्रशासनाकडे याबाबत तक्रार देण्यात येणार आहे. आता नगरपालिकेची वाहने आल्यास ती अडविण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे सचिव आनंद भुसार, गुड्डू उदासी, उपअभियंता मयुरी पवार, एसओएसचे प्राचार्य नरेंद्रसिंह चौहान, संदीप गुगलिया आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneurs protest MIDC waste