मरणानंतरही सोसाव्या लागतात नरकयातना...वाचा 

file photo
file photo

वणी (यवतमाळ) : तालुक्‍यातील 135पैकी किमान 66 गावांत स्मशानभूमीच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या सर्व गावांत खासगी जमीन, नदी, गायरान व ओढ्याकाठी अंत्यसंस्कार केले जातात. काही दिवसांपूर्वी तालुक्‍यातील पळसोनी येथे चक्क सरणावरील जळते प्रेत नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहाला लागल्याने मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना होत असल्याने मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराचा अंत सुखद व्हावा, अशी मागणी होत आहे. या भीषण वास्तवतेने "वणी तस बहुगुणी...पण प्रशासनात वाली नाही कुणी', अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

प्रशासनाकडून मागणीला केराची टोपली 
निर्गुडा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या वणी तालुक्‍यातील 66 गावांत स्मशानभूमीची साधी सोय नसल्याची बाब पुढे आली आहे. मृत्यूनंतर अखेरचा संस्कार करण्यासाठी हक्काची जागा देण्याचे औदार्य प्रशासनाकडून मिळत नसल्याने ग्रामीण भागात प्रशासनाप्रति संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे किमान 66 गावांतील नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनाने आणून ठेवली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत अखेरच्या प्रसंगाला नातेवाइकांसह आप्तेष्टांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी पळसोनी येथील जळते सरणच मृतदेहासह पाण्याच्या प्रवाहाला लागल्याचे वास्तव प्रशासनाच्या तकलादू धोरणाचा परिपाक ठरतो आहे. पळसोनीच्या गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निधीची वाट न पाहता लोकवर्गणीतून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करून प्रशासनाला चपराक दिली आहे. 

हे वाचा— चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम 

66 गावांत आजच्याघडीला स्मशानभूमीच नाही 
मृत्यूनंतर अखेरचा विधी योग्य पद्धतीने पार पडावा, अशी सर्वांची अपेक्षा असते. तालुक्‍यातील 135पैकी 66 गावांत आजच्याघडीला स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. अनेक गावांत स्मशानभूमीचे बांधकाम झाले नसल्याची विदारक स्थिती समोर येत आहे. या गंभीर बाबीचे स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाने अजूनही गांभीर्याने घेतले नसल्याने 66 गावांतील नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शासनाने ही गंभीर बाब आतातरी गांभीर्याने घेऊन मृतदेहाची हेळसांड थांबवावी. मात्र, तूर्तास तरी मरणानंतरही नरकयातना भोगाव्या लागत असल्याचे भीषण वास्तव नाकारता येणार नाही. 

वणी तालुक्‍यातून 75 स्मशानभूमींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 26 गावांतील स्मशानभूमी जनसुविधेतून मंजूर झाले होते. मात्र, यात निधी कमी असल्याने नऊ स्मशानभूमींचे बांधकाम मंजूर करण्यात आले. अन्य फंडातून ही कामे केली जात नसल्याने तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित बांधकामांना जिल्हा परिषदेकडून स्थगिती देण्यात आली आहे. जवळपास सर्वच गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून एखाद्या विशेष निधीची मागणी करून स्मशानभूमीची कामे केली जाणार आहेत. 
- संजय पिंपलशेंडे, सभापती, पंचायत समिती, वणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com