कोरोनाच्या धाकाने गंभीर रुग्णांची सुद्धा होतेय तेलंगणाच्या सीमेवर अडवणूक 

Sironcha Patient
Sironcha Patient

सिरोंचा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला, शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यातील नागरिकांना आजही आरोग्य सेवेसाठी पायपीट करावी लागते. या भागात आरोग्याच्या चांगल्या सोयी नसल्याने रुग्ण तेलंगणा राज्याचा आधार घेतात. मात्र, सद्यस्थितीत कोरोनामुळे गंभीर आजारी रुग्णांनाही प्रवेश नाकारला जात असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

सिरोंचा तालुका तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून तालुक्‍यातील नागरिकांचे या दोन्ही राज्यांसोबत रोटी-बेटीच्या व्यवहारासोबतच बाजारपेठ आणि प्रामुख्याने आरोग्य सेवेसाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद, मांचेरियल, करीमनगर, वारंगल या शहरात जातात. सिरोंचा येथे अत्याधुनिक सुविधेचे रुग्णालय नाही. सोबतच शासकीय रुग्णालयात रिक्त पदांचा डोंगर, औषधींचा तुटवडा आहे. यामुळे सिरोंचा तालुक्‍यातील रुग्णांना जवळच असलेल्या तेलंगणा राज्याचा आधार घ्यावा लागतो. 

भाषेच्या अडचणीमुळे करतात तेलंगणात उपचार 

सिरोंचा तालुक्‍यातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जाण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर येथे जावे लागते. येथे जाण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर प्रवास करावा लागतो. कधी-कधी सिरोंचा येथून रेफर केलेल्या रुग्णांना अहेरी किंवा गडचिरोली येथील रुग्णालयात नेत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सिरोंचा तालुक्‍यातील नागरिकांना भाषेची अडचण निर्माण होत असल्याने नागरिक तेलंगणात उपचारासाठी जाणे सोयीचे असते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे चेन्नुर मार्ग आणि कालेश्वर मार्गावर तेलंगणा सरकारने तपासणी नाके लावले असून अतिआवश्‍यक सेवेचा परवानगी असताना सुद्धा रुग्णांना नेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत समोर जावे लागत आहे. 

पास असूनही रुग्ण रखरखत्या उन्हात ताटकळत 

दोन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्‍यातील सुंकरअल्ली गावातील भास्कर आप्पाजी हे झाडावरून पडल्याने त्यांना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. परंतु तेथील डॉक्‍टरांनी पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातून मांचेरियल येथे नेण्यासाठी रेफर केले. कागद, कोविड तपासणी कागदपत्रे उपलब्ध करून दिली. त्यानंतर नातेवाईक रुग्णाला घेऊन तेलंगणा राज्यात निघाले. मात्र, प्राणहिता नदीजवळील तेलंगणा हद्दीतील नाक्‍यावर तेलंगणातील पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता असतानाही हुज्जत घातली. यावेळी नातेवाइकांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोग्य विभागाला पास दिल्यानंतरच रेफर केल्याचे सांगितले. परंतु रुग्णाला रखरखत्या उन्हात ठेवून बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर पुन्हा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून तपासणी नाक्‍यावरील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर तेलंगणात जाण्याची परवानगी मिळाली. मात्र, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तब्बल तीन तास रखरखत्या उन्हात ताटकळत राहावे लागले. 

तपासणी न करताच पाठवतात मजूर 

गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने सिरोंचा तालुक्‍यातील रुग्णांना तेवढे बारकाईने तपासणी करण्याची आवश्‍यकता नसताना सुद्धा कागदपत्रे तपासणीसाठी तेलंगणा राज्याच्या सीमेवर तासन्‌तास उभे राहावे लागते. महाराष्ट्राच्या सीमेकडून जाणाऱ्या नागरिक किंवा रुग्णांना जाण्यासाठी विविध प्रकारची तपासणी केली जात आहे. मात्र, तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या मजुरांची कुठल्याही प्रकारची तपासणी तेथील आरोग्य यंत्रणेमार्फत होत नाही. त्यामुळे महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागावर अतिरिक्त ताण पडत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com