युती तुटली तरी मनपात भाजप बिनधास्त

file photo
file photo

अमरावती : राज्यातील सत्तांतराचा परिणाम स्थानिक महापालिकेतील सत्तेवर मात्र जाणवणार नाही. भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. भाजपला सत्तेतून घालविण्याइतके संख्याबळ विरोधकांना जुळविणे अशक्‍य आहे. त्यामुळे महापालिकेतील भाजप सध्यातरी बिनधास्त आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. महापालिकेतील 87 पैकी 45 सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांची एकहाती सत्ता आहे. शिवसेनेने राज्यातील युतीधर्म पाळत भाजपसोबत स्थानिक पातळीवर युती केली. युवा स्वाभीमान पक्षानेही भाजपसोबत मैत्री करून तीन सदस्यांचे समर्थन दिले. रामदास आठवले यांचा रिपाई पक्ष भाजपसोबत आहे. त्यांच्या एकमेव सदस्यांची गणतीही युतीत झाली असल्याने युतीचे सभागृहातील संख्याबळ 56 वर पोहोचले. बहुमतासाठी आवश्‍यक असलेला जादुई आकडा एकट्या भाजपकडे आहे.
राज्यात भाजप शिवसेना युती तुटल्यात जमा झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्याचा फारसा परिणाम भाजपच्या महापालिकेतील सत्तेवर होणार नाही. शिवसेना बाहेर पडली तरी बहूमताचा आकडा भाजपकडे असल्याने सेनेचीच घुसमट होणार आहे. सभागृहात कॉंग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यांच्याकडे पंधरा सदस्य आहेत. एमआयएमकडे दहा, बसपकडे पाच असे संख्याबळ आहे.
युती करताना सेनेने उपमहापौर पद मागितले होते, ते त्यांना दिल्या गेले नाही. गटनेते पदासह विषय समितीचे सभापतिपद व स्थायी समितीत संख्याबळानुसार सदस्यपद मिळाले. गेली अडीच वर्ष सेनेने भाजपला घेरण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. आता राज्यातील युती तुटण्यात जमा झाल्याने स्थानिक पातळीवरही त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महापालिकेतील पक्षीय संख्याबळ
भाजप ः 45
कॉंग्रेस ः15
शिवसेना ः 07
एमआयएम ः10
बसप ः 05
युवा स्वाभीमान ः03
रिपाई (आ) ः 01
अपक्ष ः 01
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com