प्रत्येकीचे असावे आरोग्यदायी शपथपत्र 

बुधवार, 4 एप्रिल 2018

- घर-ऑफिस सांभाळणाऱ्या 70 टक्के महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी 
- वंध्यत्वाच्या समस्येचा टक्का वाढतोय 
- धावपळ, ताण-तणाव, सकस आहाराअभावी 42 टक्के महिलांना जीवनशैलीतून आजार 
- थायरॉईडच्या 100 रुग्णांमध्ये 75 रुग्ण महिला 

नागपूर - बॅंकिंग-फायनान्ससारखे कॉर्पोरेट क्षेत्र असो की, मोनोरेल चालविण्याचा मान मिळवण्याची संधी; विचारवंतांचे क्षेत्र असो की, वैद्यकीय. सर्वच क्षेत्रातील विकास पटलावर महिला आघाडीवर आहेत. मात्र, या आधुनिक महिलांनी अद्याप आरोग्यदायी जगण्यासाठी शपथपत्र बनवलेले नाही. एकाचवेळी घर आणि ऑफिस (मल्टिटास्किंग) अशा दोन्ही पातळ्यांवर कसरत करताना आरोग्याच्या विचाराला जागाच नाही. त्यामुळे 70 टक्के कामकाजी महिला अनारोग्याच्या विळख्यात आहेत. विशेष असे की, दहापैकी सात महिलांना आरोग्याच्या कोणत्या ना कोणत्या समस्या भेडसावत आहेत. 

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जीवनशैली अंगीकारणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही सर्वसामान्य बाब बनली आहे. थायरॉईडच्या 100 रुग्णांमध्ये 75 रुग्ण महिला असतात. त्यांचा वयोगट 30 ते 55 असल्याचे एका अध्ययनातून पुढे आले आहे. याच अध्ययनात 42 टक्के कामकाजी महिला जीवनशैलीतून आलेल्या उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, नैराश्‍य, पाठदुखी, हृदयविकाराने त्रस्त आहेत. 22 टक्के महिला विविध आजारांच्या विळख्यात आहेत. अनारोग्याचा अंधार घेऊन जगणारी महिला अजूनही डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीसारखी जगत आहे, असे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले. 

नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने जीवनशैलीतील बदलातून व्यसनाधीनता वाढली आहे. व्यसनधीनतेमुळे वंध्यत्वाची मोठी समस्या भेडसावत आहे. यासोबतच लठ्ठपणा, नैराश्‍य, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, हृदयाचे आणि मुत्रपिंडाचे आजार आढळतात, असे "एसीसीएई' या संस्थेच्या सर्वेक्षणातून निदर्शनाला आले आहे, असे प्रसिद्ध स्त्री आणि प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख यांनी सांगितले. 

 

नागपुरात व्यसनमुक्‍ती केंद्राच्या सर्वेक्षणातून एकूण व्यसनाधीन व्यक्तींमध्ये 3 टक्‍के स्त्रिया असल्याचे निदर्शनाला आलंय. ग्रामीण भागातील कष्टकरी, मजूर महिलांमध्ये तंबाखू आणि गुटखा सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांना सकस आहार मिळत नाही. याउलट चित्र कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांमध्ये आहे. दारू, ब्राऊन शुगर, सिगारेट, हुक्का पार्लरच्या व्यसनांशिवाय अनेक महिलांना झोपेच्या गोळ्या, कफ सिरप, मानसिक आजारावरील औषधांचे व्यसन दिसते. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, वंध्यत्व वाढतंय. अनारोग्याचा काळोख होण्यापूर्वी आरोग्यदायी उजेडाकडे प्रवासासाठी प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्यदायी शपथपत्र तयार करावे. 
- डॉ. सुषमा देशमुख, सचिव, स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ संघटना, नागपूर. 

 

आरोग्यदायी जगण्यासाठी 
- रक्तगट, रक्तचाचणी, हिमोग्लोबिनची चाचणी आवश्‍यक 
- कुटुंबातील इतिहास असल्यास सिकलसेल, थायरॉईड तपासावे 
- पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम तपासावा 
- गर्भवतीने एचआयव्ही, सिकलसेल आणि इतर चाचण्या कराव्यात 
- घरी नात्यात "ब्रेस्ट कॅन्सर'चा इतिहास असल्यास वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी 
(असल्यास कॅन्सर प्रतिबंधक लस घेता येईल) 
- चाळिशीनंतर महिलांनी दरवर्षी ऑस्टिओपोरोसिसची चाचणी करावी 

Web Title: Every women should be Healthful Affidavit