#NagpurWinterSession : ही महाविकास आघाडी नव्हे, दहा तोंडाचे सरकार

sudhir mungantiwar
sudhir mungantiwar

नागपूर : शेतकऱ्यांना शपथपत्र, जाहीरनाम्यातून अनेक आश्‍वासन दिले. त्याबाबत निर्णय कधी घेणार? याबाबतची वेळ सांगा. आम्ही काय केले, ते सांगून पळ काढू नका. हे दहा पक्षाचे सरकार आहे. दहा तोंडे कुणाची होती, हे सांगायची गरज नाही, असे नमूद करीत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

विधानसभेत मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्‍वासनाचा उल्लेख करताना मुनगंटीवार यांनी सरकारने सरड्याप्रमाणे रंग बदलू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. ठिबक सिंचन योजनेसाठी 100 टक्के अनुदानाबाबत सरकारने घोषणा करावी. धानाला साडेतीन हजारांचा दर, 12 तास मोफत वीज याबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तरात स्पष्टता आणावी. आताच द्या म्हणणार नाही. परंतु, या आश्‍वासनपूर्तीची वेळ सांगावी, असा आग्रह त्यांनी धरला. राजस्थान, मध्य प्रदेशात कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. 

कर्जमुक्तीच्या आश्‍वासनपूर्तीवर प्रश्‍नचिन्ह 
सरकार 50 वर्षे राहील, असा दावा केला. 50 नव्हे, पाच हजार वर्षे राज्य करा. मात्र, दिलेले आश्‍वासन एका वर्षात पूर्ण करणार, दोन वर्षात की 50 वर्षे लावणार, हेही स्पष्ट होऊ द्या, असे नमूद करीत त्यांनी "जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं', असा टोलाही सरकारला हाणला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजकारण करायचे नाही, असे स्पष्ट करीत मुनगंटीवार यांनी अभद्र युती करणाऱ्या सरकारला आश्‍वासनाचा विसर पडला, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विस्मरणात टाकेल, असा इशाराही त्यांनी दिला. "खूप गर्जना आणि वल्गना करीत गेले बांधावर, तरी ना फुंकली फुंकर बळीराजाच्या जखमेवर' असा काव्यमय टोला हाणत त्यांनी भाषणाचा शेवट केला. या चर्चेत प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, जयकुमार गोरे, नीतेश राणे यांनीही चर्चेत भाग घेतला. 

उलटा चोर कोतवाल को डांटे : गुलाबराव पाटील 
मागील सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख देताना अडीच वर्षे लावली. आता 21 दिवसांच्या सरकारकडून अपेक्षा ठेवत आहेत. हे तर "उलटा चोर कोतवाल को डांटे', असे आहे, असा टोला सेनेचे गुलाबराव पाटील यांनी लावला. बुलेट ट्रेनचे पैसे शेतकऱ्यांना वळते का केले नाही. बुलेट ट्रेनने पोट भरणार आहे का? असा सवाल करीत त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com