परीक्षा केंद्रावर पार्किंगच्या नावावर लूट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून पार्किंग आणि इतर कुठलेही शुल्क आकारू नये, असे पत्र काढले. मात्र, शहरातील अनेक महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. विद्यापीठातील भरारी पथकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाविद्यालयांकडून हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. शहरातील प्रेरणा कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांकडून पार्किंगचे शुल्क आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. 

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा चौथा टप्पा मंगळवारपासून सुरू झाला आहे. हा टप्पा फार महत्त्वाचा असून, चारशेहून अधिक परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन टप्प्यांत घेण्यात येते. एका परीक्षा केंद्रावर दिवसभरात किमान एक ते दोन हजारांच्या घरात विद्यार्थी परीक्षा देतात. या सर्व विद्यार्थ्यांकडून वाहन पार्किंगच्या नावावर 10 ते 20 रुपयांची वसुली केली जाते. यासंदर्भात पार्किंगमधील व्यक्‍तीला विचारणा केली असता, हा महाविद्यालयांचा नियम असल्याचे सांगितले. रेशीमबाग येथील प्रेरणा कॉन्व्हेंटमध्ये मंगळवारी (ता. 29) काही विद्यार्थ्यांनी पार्किंगमधील व्यक्तीशी भांडणही केले. मात्र, यात आमची काहीही चुकी नसून, अडचण असल्यास प्राचार्यांशी बोलावे, असे सांगितले. शेवटी विद्यार्थी प्राचार्यांशी बोलायला गेले असता त्यांनी परीक्षा विभागाचे काम सांभाळणाऱ्या प्रमुखांकडे पाठविले. मात्र, परीक्षा विभागाच्या प्रमुखांनी हा नियम महाविद्यालयांचा असून, पार्किंगचे पैसे द्यावेच लागतील, असे सांगितले. तसेच पार्किंगचे शुल्क आकारू नये, असे कुठलेही पत्रक अद्यापही मिळाले नसल्याचे उत्तर दिले. ही बाब परीक्षा नियंत्रण डॉ. नीरज खटी यांच्या निदर्शनात आणून दिली असता त्यांनी पार्किंग व इतर कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये. तसे पत्र विद्यापीठाने काढल्याचे सांगितले. मात्र, हा विषय एकट्या प्रेरणा कॉन्व्हेंटचा नसून, शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये पार्किंगच्या नावावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची लूटमार केली जात आहे. त्यामुळे याकडे विद्यापीठाने जातीने लक्ष द्यावे व अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये, असे पत्र कुलगुरूंच्या आदेशाने काढण्यात आले आहे. त्यामुळे कुठलेही महाविद्यालय असे शुल्क आकारत असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. 

-डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक 

Web Title: Examination center parking loot

टॅग्स