esakal | तुषार पुंडकर हत्याकांड : मारेकऱ्यांचे धागेदोरे शोधण्यासाठी बारकाईने तपास
sakal

बोलून बातमी शोधा

tushar pundkar

पथकामध्ये अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या शिवाय, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर सहा पथकेही गठीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तुषार पुंडकर हत्याकांड : मारेकऱ्यांचे धागेदोरे शोधण्यासाठी बारकाईने तपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी बारकाईने धागेदारे जुळविण्यास सुरुवात केली असून, मारेकऱ्यांच्या शोधार्थ पथके विविध दिशेने रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.


विश्‍वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेल्या इतर राज्यात आरोपी पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवल्याची माहिती आहे. यासाठी पोलिस महासंचालकांनी समांतर पथक गठीत केले असून, पथकामध्ये अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या शिवाय, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर सहा पथकेही गठीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिस तुषार पुंडकर यांच्या सीडीआर तपासून मारेकरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेल्याने अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळाजवळचा दवाखाना, बँकेचे सीसीटीव्ही फुटेज बघितले; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती आहे.

क्लिक करा आणि पाहा - राज्यात नावाजलेले शेततळ्यांचे गाव पाहिले का? ते आता बनले कृषी पर्यटन स्‍थळ

मृत्यूपूर्व जबानी घेता न आल्याने अडथळा
तुषार पुंडकर यांचा मृत्यूपूर्व जबानी न घेता आल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण होत आहेत. तुषार पुंडकर हे गंभीर जखमी झालेले होते. त्यामुळे ते काहीच बोलू शकले नसल्याने जबानी रिपोर्ट घेण्यास अडचणी येत होत्या, अशी माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहे. तरीही पोलिस अधिकारी-कर्मचारी या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी बारकाईने तपास करीत आहेत.


पोलिस कर्मचारी बनले फिर्यादी
तुषार पुंडकर यांच्यावर पोलिस वसाहतीमध्ये गोळीबार झाला. पहिला फायर झाल्यानंतर याच वसाहतीत राहणारे पोलिस कॉन्स्टेबल भास्कर सांगळे यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देऊन नागरिकांच्या मदतीने पुंडकर यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर शहर आणि ग्रामीण पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रकरणात भास्कर सांगळे यांचीच फिर्याद घेण्यात आली आहे.


सर्वच शक्यता तपासण्याचा प्रयत्न
तुषार पुंडकर हत्याकांडाचा तपास करणारे पोलिस सर्वच दिशेने तपास करीत आहेत. या तपासात अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात आहे. मातब्बर पोलिस अधिकारी- कर्मचारी समन्वयाने तपास करीत असून, राजकीय, सामाजिक, खासगी आणि पूर्व वैमन्यशातील अनेक संशयितांची फेरतपासणी करीत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती आहे.


त्रीसूत्रीच्या बळावर मारेकऱ्यांना गजाआड करू
पोलिस, पब्लिक आणि पत्रकार (पी.पी.पी.) एकत्र आले तर परस्पर सहकार्याने कोणताही गंभीर गुन्ह्याचा तपास यशस्वी होऊ शकतो, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे या पीपीपी त्रीसूत्रीच्या बळावर प्रहार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरच गजाआड करू,असा विश्‍वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.  या हत्याकांडात तपासाची व्याप्ती हळुहळू वाढविण्यात येत असून येत्या सात ते आठ दिवसांत अपेक्षित लक्ष्य गाठण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.तपास अधिका-यांना महत्वाचे धागेदोरे सापडले असून आधुनिक तंत्रज्ञान व लोकसहकार्याच्या माध्यमाने तपास पथके या गुन्ह्याची उकल करणार असल्याचे समजते.आतपर्यंत पाच ते सहा संशयीतांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असले तरी या प्रकरणात पीन पॉईंट पुरावा शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. एकूण 30 कर्मचा-यांची सहा पथके तहान-भूक विसरुन अहर्निश तपास करत आहेत.पोलिस त्यांच्याकडे या हत्याकांडासंदर्भात आलेली प्रत्येक माहिती तपासून घेत आहेत.

सुपारी किलींगचा संशय
 हा सुपारी किलींगचा प्रकार असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिसांचा तपास पोहोचला आहे. पोलिस त्या दिशेने तपास करत असून सुपारी देणाऱ्याचा व घेणाऱ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना सुपारी घेणारे मारेकरी बाहेरचे असण्याची शंका आहे. गोळीबाराची घटना रात्री दहाच्या सुमाराची असल्याने त्यावेळी शहराच्या रस्त्यावर थोडी-फार रहदारी असते. त्यामुळे मारेकऱ्यांना दुचाकीवरून पलायन करताना एखाद्या नागरिकाने पाहिले का याचा शोध पोलिस घेत आहेत.