नवेगावबांध येथे विनापरवाना मुरमाचे उत्खनन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

नवेगावबांध (गोंदिया) : येथील खोली पहाडी, पलटू पहाडीच्या पलीकडील जागेतून चान्ना कोडका रस्त्यावरील मुरमाच्या खाणीतून महिनाभरापासून परिसरातील काही ठेकेदार अवैधरीत्या मुरूम उत्खनन करीत आहेत. यातून कंत्राटदारांनी लाखो रुपयांचा महसूल बुडविला. यामागे या कंत्राटदारांना महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते.

नवेगावबांध (गोंदिया) : परिसरातील काही ठेकेदार अवैधरीत्या मुरूम उत्खनन करीत आहेत. यातून कंत्राटदारांनी लाखो रुपयांचा महसूल बुडविला. याबाबत तक्रार करणाऱ्या येथील शैलेश शर्मा या सामाजिक कार्यकर्त्याला कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शर्मा यांनी नवेगावबांध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना, महसूल विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना, नवेगावबांध परिसरातील चार-पाच कंत्राटदारांनी चान्ना कोडका रस्त्यावरील महावितरणच्या पावर हॉउसजवळील मुरमाच्या खाणीतून, पलटू पहाडी पलीकडच्या जागेतून तसेच खोली पहाडीच्या खालील भागातून हजारो ट्रॅक्‍टर मुरमाचे अवैधरीत्या उत्खनन करीत असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश शर्मा यांना मिळाली. त्यांनी नवेगावबांध येथील तलाठी कुंभरे यांना मुरूम उत्खननाला परवाना दिला गेला आहे काय? याबाबत विचारणा केली. तेव्हा तलाठी कुंभरे यांनी त्यांना परवाना दिला गेला असल्याची माहिती दिली. याबाबत शर्मा यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना भ्रमणध्वनीवरून नवेगावबांध येथे मुरूम उत्खननाचे परवाने दिले गेले काय? याबाबत विचारणा केली. तेव्हा तहसीलदारांनी मुरूम उत्खननाची परवानगी नवेगावबांध येथे कोणालाही देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. यावर शर्मा यांनी येथील तलाठी कुंभरे यांना तहसीलदारांनी कोणालाही परवाना दिला नसल्याचे सांगितले. तेव्हा हे लोक म्हणजेच कंत्राटदार घरगुती उपयोगासाठी मुरूम नेत असल्याचे सांगितले. मात्र परवानगी असल्याचे सांगितले नाही. उत्खनन करण्यात आलेला मुरूम, प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या खासगी लोकांच्या प्लॉटच्या सपाटीकरणासाठी वापरला गेल्याची माहिती शर्मा यांनी दिली. त्यानंतर शर्मा यांनी या प्रकाराची माहिती नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनादेखील दिली. दरम्यान, शर्मा हे चिचगड येथे निघून गेले. तेव्हा नवेगावबांध बसस्थानकावर लीलाधर काशीवार (रा. बोंडे खोली) यांनी शर्मा कुठे आहेत, असे त्यांच्या मित्रांना विचारले असता त्यांनी ते बाहेर गेले असल्याचे सांगितले. तेव्हा काशीवार यांनी शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार परत आल्यानंतर शर्मा यांना त्यांच्या मित्रांनी सांगितला. याबाबत नवेगावबांध पोलिस ठाण्यामध्ये कंत्राटदार काशीवार यांच्याविरुद्ध शर्मा यांनी तक्रार केली. असाच प्रकार वाळू, गिट्टी यांच्या उत्खननाबाबत होत असल्याची तक्रार आहे. महसूल विभाग अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

एखाद्या शेतकऱ्याने घरगुती वापरासाठी ट्रॅक्‍टरभर मुरूम अंगणात टाकण्यासाठी आणला तर, दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड त्याच्याकडून वसूल केला जातो. कंत्राटदार हजारो ट्रॅक्‍टर मुरूम अवैधरीत्या विक्रीसाठी नेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. तक्रार करायला गेले तर, कंत्राटदार जीवे मारण्याची धमकी देतात. पोलिसांनी अशा कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी.
- शैलेश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते, नवेगावबांध.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavation of illeagle murum at Navegoanbandh