दिवाळीत "घर वापसी'साठी अतिरिक्त सुविधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कामाच्या निमित्ताने बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्यांना दिवाळीत घरी परतण्याचे वेध लागतात. यामुळे बस, रेल्वे, विमानातील गर्दी वाढते. बस, रेल्वेतील गर्दीला पारावारच नसल्याने खासगी व्यावसायिक संधी इनकॅश करून घेण्यासाठी सरसावतात. प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पहिल्या टप्प्यात पुणे मार्गावर ज्यादा शिवशाही बसेस चालविण्याची घोषणा केली आहे. 23 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान पुण्याहून नागपूरला येण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. या बसेस सायंकाळी 7.30, रात्री 8 आणि 8.30 वाजता पुण्याहून निघतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर गाठतील. या वातानुकूलित आसनी बसचे प्रतिप्रवासी भाडे 1380 रुपये राहील. याशिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार नागपूर येथून पुण्याला जाण्यासाठी सकाळी 10 पासून बसेस उपलब्ध असतील. अधिक मागणी वाढल्यास ज्यादा बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे. एमएसआरटीसी ओआरएस या ऍनरॉईड मोबाईल ऍपवर या बसेसचे बुकिंग करता येईल.
याच प्रमाणे हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान पूजा स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार असून ही गाडी पाच फेऱ्या करणार आहे. 08609 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा स्पेशल 2 ते 30 ऑक्‍टोबरदरम्यान दर बुधवारी सायंकाळी 5.35 वाजता रवाना होईल. गुरुवारी सकाळी 10.20 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि मध्यरात्री 12 वाजता एलटीटी स्थानकावर पोहोचेल. याचप्रमाणे 08610 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया पूजा स्पेशल 4 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी सकाळी 7.55 वाजता रवाना होईल. ही गाडी रात्री 10.25 ला नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता हटिया स्थानक गाठेल. या गाडीला चार तृतीय श्रेणी वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी वातानुकूलित, चार स्लिपर आणि 3 एसएलआर डबे राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra facility for "Homecoming" in Diwali