देववाडीमध्ये ट्रकचा बनावट अपघात; गाडीचा क्रमांक तर बदललाच पण १८ टन सुकामेवाही गायब

रूपेश खैरी
Wednesday, 18 November 2020

देववाडी जवळ सुक्‍यामेव्याचा ट्रकला अपघात झाला. या ट्रकमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल होता. जवळपास 18 टन सुकामेवा यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रक उलटताच त्यातील मोठ्‌या प्रमाणावर मेवा नागरिकांनी लांबविल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या पोलिसांनी माल नेणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.

कारंजा (जि. वर्धा) :  महामार्गावर देववाडी लगत सुक्‍यामेवाचा ट्रक उलटला. असे असले तरी हा अपघात बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. यावरून पोलिसांनी ट्रकचालक आणि वाहकाला अटक केली आहे. या दोघांनी काही इतर आरोपींच्या सहाय्याने यातील बऱ्याच साहित्याची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांना आष्टी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

देववाडी जवळ सुक्‍यामेव्याचा ट्रकला अपघात झाला. या ट्रकमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल होता. जवळपास 18 टन सुकामेवा यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रक उलटताच त्यातील मोठ्‌या प्रमाणावर मेवा नागरिकांनी लांबविल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या पोलिसांनी माल नेणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. याबाबत तालुक्‍यातील सारवाडी गावात व लगतच्या पारधी बेड्यावर पोलिसांची गाडी कालपासून सतत फिरत आहे. आजही याबाबत काही नागरिकांची चौकशी करण्यात आली. सारवाडी येथील काही संशयित नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्वी, तळेगाव, कारंजा व वर्धा तसेच आष्टी पोलिसांची चमू कालपासून यात सक्रिय होती. 

हेही वाचा - पशुपक्षी वनात केला दीपोत्सव साजरा; वनविभाग व पीपल फॉर ऍनिमल्सचा उपक्रम

या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू असला तरी त्यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात चालक आणि वाहकाने बराचसा मुद्देमाल घटना घडण्यापूर्वीच लांबविल्याचा संशय ट्रान्सपोर्ट मालकाने व्यक्‍त केला आहे. 

मुंबईवरून निघालेल्या ट्रकचा बदलला क्रमांक - 
नागपूर येथे ऑर्डर असल्याने दिग्विजय फ्रेंट सर्व्हिस ट्रान्स्पोर्ट नागपूर येथून बदाम, पिस्ता, खारीक, खजूर, अजिनोमोटो, मिक्‍स ड्रायफुट, जावंत्री, मसाल्याचे पदार्थ असे 40 लाखांचे साहित्य आणि नागपूर येथील अहमद सय्यद यांची आरामशीन घेऊन एमएच 40 एके 5333 क्रमांकाचा ट्रक घेऊन चालक जमिर अहेमद अमिल अहेमद हा निघाला. अपघात झाल्यावर वाहनाची पाहणी केली असता यात वाहनाचा क्रमांक दुसराच दिसला. अपघात झालेल्या वाहनाचा क्रमांक एमएच 40 बीजी 1599 असा दिसला. हा क्रमांक खामगाव येथे बदलल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यामुळे या अपघातात आणखी काही व्यक्‍तींचा समावेश असल्याचा संशय आहे. 

हेही वाचा - ग्राहकांची वर्दळ तर कमी होईल, पण कुठेही दिसणार नाही...

नागपुरात पोहोचण्यापूर्वीच 31 टनाची गाडी झाली 23 टनाची - 
मुंबई येथून निघालेल्या गाडीचा क्रमांक बदलल्याचे लक्षात येताच मालकाने चौकशी केली. यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्‍यावरून गाडी गेली असता तिथे या गाडीचे वजन 23 टन भरले. यामुळे यातील साहित्य पूर्वीच लांबविल्याचा आरोप मालकाकडून होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake truck accident in karanja of wardha