ग्राहकांची वर्दळ तर कमी होईल, पण कुठेही दिसणार नाही दिवाळी मिलनाची धूम

राजेश रामपूरकर
Wednesday, 18 November 2020

आता व्यापाऱ्यांनीही सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत यंदा दिवाळी मिलनाची परंपरा खंडीत केली आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर होणाऱ्या दिपावली मिलनाची धूम यावर्षी कुठेही दिसणार नाही. 

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनीही सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत यंदा दिवाळी मिलनाची परंपरा खंडीत केली आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर होणाऱ्या दिपावली मिलनाची धूम यावर्षी कुठेही दिसणार नाही. 

हेही वाचा - यवतमाळातील भाईंना हवाय हप्ता; व्यावसायिकांना धमक्या; पोलिसांचे दुर्लक्ष 

सणानंतर बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी होते. व्यापाऱ्यांना कामातून थोडा निवांतपणा मिळतो. यानिमित्ताने ते एकत्रित येत असल्याने या मीलनाचे विशेष महत्त्व आहे. यात व्यापाऱ्यांसह आप्त परिचित, मित्र आणि विविध पक्षातील राजकीय नेतेही सहभागी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. शहरातील नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन या आघाडीच्या संघटनांच्या दिवाळी मीलनाची विशेष चर्चा होत असते.

हेही वाचा - महावितरणचा खिसा रिकामाच, फक्त नागपूर विभागातील थकबाकी...

एनव्हीसीसीतर्फे माजी अध्यक्षांचा सत्कार केला जातो, तर एनसीसीएलतर्फे व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. बुटीबोरी असोसिएशनच्या माध्यमातून संगीत रजनीचा कार्यक्रम, तर एमआयएच्या निमित्ताने उद्योजकांचे परिवार एकत्रित येत असतात. त्यामुळे या दिवाळी मिलनाला विशेष महत्त्व आलेले आहे. याशिवाय दि ऑईल मर्चेंटस असोसिएशन, नागपूर इतवारी सिडस मर्चंट्स असोसिएशन, दि होलसेल ग्रेन मर्चंट्स असोसिएशन, प्लायवूड मर्चंट्स असोसिएशन, पेंट मर्चंट्स असोसिएशन, जनरल मर्चंट्स असोसिएशन, लोहा ओळी असोसिएशन, बारदाना असोसिएशन आदी व्यापारी संघटना दिवाळी मिलन आयोजित करीत असते. 

हेही वाचा - मेळघाटवर स्थलांतराचे काळे ढग; स्थानिक स्तरावर रोजगाराचा अभाव

याबाबत बोलताना नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलाश जोगानी म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी मीलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कमेटीस्तरावर छोट्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यावर भर राहणार आहे. बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्णय घेतला नसला तरी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali get together of traders cancel due to corona in nagpur