जावयामुळे सासुरवाडी अडचणीत; पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एकाच वेळी कोरोनाबाधित असलेले नऊ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या नऊ रुग्णांपैकी चार रुग्णांच्या संपर्कात असलेला व्यक्ती मागील तीन दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथे राहात होता.

धाबा (जि. चंद्रपूर) : गावखेड्यात जावयांना सासरकडील मंडळींव्यतिरिक्त गावकरीही तेवढाच मान देतात. मात्र, अशाच एका जावयामुळे गावच अडचणीत आले आहे. गुरुवारी (ता.21) सापडलेल्या नऊ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी चार जणांच्या संपर्कातील व्यक्ती मागील तीन दिवसांपासून आपल्या सासुरवाडीत धाबा येथे वास्तव्याला होते. पोलिसांनी जावयाला ताब्यात घेतले आहे. परंतु गावकऱ्यांना आता कोरोनाची भीती सतावत आहे. जावयाने सासुरवाडीला संकटात ढकलले, अशी चर्चा गावात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एकाच वेळी कोरोनाबाधित असलेले नऊ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या नऊ रुग्णांपैकी चार रुग्णांच्या संपर्कात असलेला व्यक्ती मागील तीन दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथे राहात होता. हा व्यक्ती मूळचा सिंदेवाही तालुक्‍यातील असून त्याची सासुरवाडी धाबा येथे आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी दिलेल्या माहितीच्या आधाराने शुक्रवारी पोलिस, आरोग्य, महसूल विभागाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. सासुरवाडीतील पाच व्यक्तींचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे.

अवश्य वाचा- केवळ शंभर रुपये द्या आणि प्रवासासाठी ई-पास घ्या, कुठे आणि कुणी सुरू केला हा धंदा?

या व्यक्तीला तपासणीसाठी चंद्रपूरला नेण्यात आले. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. धाबा ग्रामपंचायतमध्ये तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित निघाला तर त्यावर गावात करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनाचा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच रोशनी अनमुलवार यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family of father in law trouble due to son in law and police arrest him