कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांनीच करावी का? पुरुषांचा अहंकारच मोठा...

family planning
family planning

अमरावती : छोटा परिवार सुखी परिवार, अशी घोषणा देत राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम लागू झाला. त्यामागे लोकसंख्या नियंत्रणासोबतच परिवार नियोजन ही संकल्पना होती. स्त्री व पुरुष या दोघांच्याही शस्त्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे. मात्र स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण राज्यात अडीच ते तीन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. गर्भधारणा लांबविण्यासाठी स्त्रिया व पुरुषांनी बाजारात आलेल्या औषधांचा आश्रय घेतल्याने शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रणासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरू करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्यात या कार्यक्रमाची सुरुवात स्वतःच्या घरातून केली, असे त्यांनी स्वतः म्हटले आहे. मात्र राज्यातील गेल्या तीन वर्षांतील परिवार नियोजनाची आकडेवारी बघितल्यास या कार्यक्रमास मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा वाटा अल्पसा आहे. गेल्या तीन वर्षात पुरुषांचे हे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के इतके आहे.

यामागे पुरुषी अहंकार कारणीभूत असल्याचे समजते. मुलगा किंवा मुलगी झाल्यास महिलांनीच शस्त्रक्रिया करवून घ्यावी, असा समज रूढ झाला आहे. स्त्रियांसोबतच पुरुषांसाठीही शस्त्रक्रियेची सुविधा आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रकमेची तरतूद आहे. शस्त्रक्रिया केल्यास पुरुषांना 1451 रुपये तर दारिद्य्र रेषेखालील महिलांना 600 व त्यावरील संवर्गातील महिलांना 250 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते.

- माणुसकीच्या दुनीयेत चमकला नाही हा "सितारा', संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

गेल्या तीन वर्षांतील कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांची तुलनात्मक आकडेवारी बघितल्यास वर्ष 2016-17 मध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण 3.19 टक्के, वर्ष 2017-18 मध्ये 2.82 व वर्ष 2018-19 मध्ये 2.22 टक्के इतके आहे.

गर्भनिरोधक औषधांचा योजनेवर परिणाम
पाळणा लांबविण्याकरिता बाजारात गर्भनिरोधक औषधांचा सुळसुळाट आहे. गर्भनिरोधक गोळ्यांसह इंजेक्‍शन, कॉपर टी असे विविध आयुधे आली आहेत. कॉपर टी पाच ते दहा वर्षांपर्यंत वापरता येते व आवश्‍यकता असेल त्यावेळी त्या काढता येऊन पुन्हा प्रजननाकरिता तयारी करता येते. असाच उपयोग इतर औषधांचाही आहे. त्यामुळे महिलांनी या औषधांचा वापर अलीकडे वाढविला आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नेताम यांनी सांगितले. त्याची सरासरी 74 टक्‍क्‍यांपर्यंत गेली आहे.

जनजागृतीचा अभाव
शस्त्रक्रिया केल्याने आपण कमजोर होतो, पौरुषत्व कमी होते, हा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. शस्त्रक्रिया केल्याने पौरुषत्वावर परिणाम होत नाही. मात्र याबाबत हवी तशी जनजागृती झालेली नाही. याशिवाय स्त्री-पुरुषांकरिता गर्भनिरोधक औषध उपलब्ध असल्याने त्याचा आश्रय घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

गर्भनिरोधक वापरण्याचे प्रमाण
तांबी (कॉपर टी) : 40.61 टक्के
गोळ्या : 74.72 टक्के
निरोध : 6.16 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com