esakal | पानगाव येथे शालेय पोषण आहार वाटपात घोळ; मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाई करण्याची पालकांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

 fraud in school nutrition in gondia district

पानगाव येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला. मात्र, येथील मुख्याध्यापक विहार मेश्राम व त्यांच्या सहयोगी शिक्षकांनी भोंगळ कारभार करीत पोषण आहार वाटपात घोळ केला.

पानगाव येथे शालेय पोषण आहार वाटपात घोळ; मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाई करण्याची पालकांची मागणी

sakal_logo
By
यशवंत शेंडे

सालेकसा (जि गोंदिया) ः तालुक्‍यातील पानगाव येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी शालेय पोषण आहार वाटपात घोळ केला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पत्रकार परिषदेतून केली.

पानगाव येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला. मात्र, येथील मुख्याध्यापक विहार मेश्राम व त्यांच्या सहयोगी शिक्षकांनी भोंगळ कारभार करीत पोषण आहार वाटपात घोळ केला. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात सध्या जिल्हा परिषद शाळा बंद असून, शासनाने पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानासुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपामध्ये घोळ केला आहे.

क्लिक करा - संगीत कलाकार दारोदार भटकत विकतोय प्लास्टिकच्या वस्तू, पण त्यातूनही भागत नाही पोटाची भूख

14 ऑक्‍टोबर रोजी पानगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार वाटप करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना नियमानुसार पोषण आहार न देता इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूगदाळ 300 ग्रॅम कमी, चना 300 ग्रॅम तसेच तांदूळसुद्धा 300 ग्रॅम कमी देण्यात आले. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापकांसह शिक्षकांना घेराव केला. 

याची सर्व माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारीतून देण्यात आली. मात्र, अद्याप कारवाई झाली नाही. दरम्यान, येत्या दहा दिवसांत मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
पत्रकार परिषदेला माजी सरपंच घनश्‍याम नागपुरे, बजरंग दलाचे सहसंयोजक हरीश नागपुरे, योगेश शहारे, महेंद्र नागपुरे, गोविंद गुलबेले, चैत्रराम लाडे, विक्रम नागपुरे, भोजराज लिल्हारे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

...तर पंचायत समितीवर धडक मोर्चा

या प्रकरणात मुख्याध्यापक, शिक्षकांवर येत्या दहा दिवसांत कारवाई करावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकून पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नक्की वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

या प्रकरणाविषयीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल.
-एस. जी. वाघमारे,
 प्रभारी गटशिक्षणाधिकारी, सालेकसा.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image