esakal | "बावाजीने काळजीत जाळून घेतले, माझ्याजवळ पैसे नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोद जाने

"बावाजीने काळजीत जाळून घेतले, माझ्याजवळ पैसे नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर ) "बावाजीने काळजीत जाळून घेतले. माझ्याजवळ पैसे नाही. शेतीला लावायला पैसा नाही. आता निंदायची सोय नाही. पाडीत झाल, इकडे घराची दिवार पडली. विहीर खचली. त्यामुळे झाडे वाळली. कर्ज कहाडलं. आता कोणी देतही नाही. मला झोप येत नाही. काय करावं सुचत नाही. आता कर्ज माफीत आले नाही. मी बेचैन होऊन शेवटी एकाच रस्ता...' असे चिठ्ठीत लिहून नरखेड तालुक्‍यातील मदना येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
प्रमोद गोपाळराव जाने (वय 53, रा. मदना, ता. नरखेड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांनी शेतात स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली होती. डोक्‍यावर असलेला कर्जाचा डोंगर, कर्जमाफीचा लाभ नाही, फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींचा वसुलीसाठी वाढलेला जाच, लिलावाच्या धमक्‍या व कर्ज मिळत नसल्याने शेती होणार नसल्याचे लक्षात आल्याने प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी पुढे आले आहे.

प्रमोद यांनी लिहिलेली चिठ्ठी
कर्जापायी पूर्ण हतबल झालो आहे. चार वर्षांपासून कर्जाखाली आहे. पोरीचे शिक्षण सुरू असताना चांगल ठिकाण आले म्हणून लग्न करून टाकलं. यासाठी गावातील कर्ज घेतले. त्याच वर्षी घरकुल आले म्हणून घर बांधले. घरकुलाचे पैसे कमी पडल्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कर्ज घेतले. पऱ्हाटी लावली, वेळेवर लावली नाही व उशिरा खत टाकले म्हणून पऱ्हाटी पार भडकून गेली. दहा थैल्याला दहा क्विंटल कापूस झाला. तेव्हापासून मी कर्जात एकसारखा दबलो आहे. दुसऱ्या वर्षी वडिलांची तब्येत, महिंद्रावाले यांचा त्रास, वेळेवर लावले नाही शेतात पिकत नव्हतं. निंदायला पैसे नाही. महिंद्रावाल्यांचे चार हफ्ते रेगुलर भरले. एक हफ्ता फुले घेऊन गेला त्याने पावती दिली नाही. मग महिंद्रावाले म्हणाले त्याला कहाडले आहे. तुम्ही पैसे दिले असे आम्हाला लिहून द्या. तसे लिहून दिले. ज्यात वजन टाकू लागले. जागा मोजून लिलावाच्या धमक्‍या देणे. बावाजीच्या तब्येतला पैसे लावले तरी दररोज फोन येऊ लागले. बारा महिन्यात मी 40+5 हजार असे 45 हजार दिले. बावाजीने या काळजीत जाळून घेतले. माझ्याजवळ पैसे नाही. शेतीला लावायला पैसा नाही. इकडून तिकडून पैसे आणून लावले. आता निंदायची सोय नाही. पाडीत झाल, इकडे घराची दिवाल पडली. विहीर खचली. त्यामुळे झाडे वाळली. कर्ज कहाडलं आता कोणी देतही नाही. बॅंकेचे 2,60,000, महिंद्राचे 1.40 लाख, गावरान 2.50 लाख आहे. मला झोप येत नाही. दोन मुली बसल्या आहे. काय करावं सुचत नाही. आता कर्ज माफीत आले नाही मी बेचैन होऊन शेवटी एकाच रस्ता...
- प्रमोद गो. जाणे

loading image
go to top