शेतकरी आले रडकुंडीला...धान पिकांना खते मिळेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

रावणवाडी व परिसरात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. या पिकाला खताची नितांत आवश्‍यकता आहे. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचे आदेश दिल्याने बहुतांश कृषी केंद्रेही लॉक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळणे कठीण झाले आहे.

रावणवाडी (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र या लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गर्भावस्थेतील धानपिकाला वाचविण्यासाठी रासायनिक खते कृषी केंद्रांत उपलब्ध नाहीत. त्यामुळे यंदाचा हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सद्यःस्थितीत हे धान पीक गर्भावस्थेत आहेत. धानपीक गर्भावस्थेत असताना काही दिवसांतच लोंबीवर येणार आहेत. याकरिता या पिकाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पीकतरी कसे वाचवावे? असा प्रश्‍न पडला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत खते न मिळाल्यास उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्‍यताही शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन रासायनिक खते उपलब्ध होतील, अशी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही बघा : Video : घर बैठे बैठे क्‍या करे म्हणत दोन बहिणींनी केले हे...

साठेबाजांकडून चढ्या दराने विक्री

ग्रामीण भागांत काही कृषी संचालकांनी रासायनिक खतांचा साठा करून ठेवला आहे. सद्यःस्थितीत गरज लक्षात घेता कृषी संचालक चढ्या दराने खताची विक्री करीत असल्याची माहिती आहे. 300 रुपयांची युरियाची बॅग 400 रुपयांना विकली जात आहे.

साठेबाजांवर कारवाई व्हावी
बहुतांश कृषी केंद्रांत खते उपलब्ध आहेत. परंतु, साठेबाज कृषी संचालक चढ्या दराने खतांची विक्री करीत आहेत. अशा साठेबाजांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- यशवंत लिल्हारे, शेतकरी, मुरपार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer did not get fertilizers for paddy crops at gondia