अवघ्या दीड एकर शेतीत उत्पन्न घेऊन 'ते' झाले लखपती..पण कसे? वाचा प्रेरणादायी बातमी  

संतोष रोकडे
Thursday, 6 August 2020

हेमराज पुस्तोडे यांच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. अर्धा एकर शेती दुसऱ्या बाजूला, तर एक एकर शेती बोंडगावदेवी ते अर्जुनी मोरगाव मार्गावर आहे. या एक एकर शेतात त्यांनी शासकीय योजनेतून विहीर बांधली.

अर्जुनी मोरगाव (जि. यवतमाळ) :  शेतकऱ्यांना कधी ओल्या, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या संकटाचा सामना करताना शेतकरी पुरते खचून गेले आहेत. परंतु, धानासह अन्य पिकांची आलटून-पालटून लागवड केल्यास अल्पभूधारक शेतकरीही लखपती बनण्याला वेळ लागत नाही. हे बोंडगावदेवी येथील हेमराज पुस्तोडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने कृतीतून दाखवले आहे.

हेमराज पुस्तोडे यांच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. अर्धा एकर शेती दुसऱ्या बाजूला, तर एक एकर शेती बोंडगावदेवी ते अर्जुनी मोरगाव मार्गावर आहे. या एक एकर शेतात त्यांनी शासकीय योजनेतून विहीर बांधली. सिंचनाची व्यवस्था केली. अर्ध्या एकरात ते दरवर्षी धानाची लागवड करतात. धानपिक निघाल्यानंतर तिथे मका, मिरची आणि मुगाचे उत्पादन घेतात. दहा आर. शेतात भाजीपाल्याची लागवड करतात. 

हेही वाचा - अवघ्या दीड एकर शेतीत उत्पन्न घेऊन 'ते' झाले लखपती..पण कसे? वाचा प्रेरणादायी बातमी  

शेतकरी झाला लखपती 

अर्ध्या एकरातील मका पिकाचे 38 हजार रुपये, तर मिरची उत्पादनात 20 हजार रुपये व मूग उत्पादनातून 20 हजार रुपये नफा प्राप्त झाला आहे. यावर्षी हेमराज पुस्तोडे यांनी 10 आर जागेत मे महिन्यात मल्चिंगचा वापर करून चवळी शेंगा व भेंडीची लागवड केली. हे पीक जुलै महिन्यात हाती आले. याकरिता सात ते आठ हजारांचा खर्च आला असून जुलै महिन्यापर्यंत 40 हजारांचे उत्पन्न मिळाले. 

भाजीपाला उत्पादनातून 50 हजार

ऑगस्टपर्यंत पीक हाती येणार असून, अजून दहा ते पंधरा हजारांचे उत्पन्न हाती येणार असल्याचे हेमराज पुस्तोडे यांनी सांगितले. दहा आर शेतीतून आठ हजारांच्या लागवड खर्चात पाच महिन्यात भाजीपाला उत्पादनातून जवळपास 50 हजारांचा नफा मिळेल, असेही हमखासपणे शेतकरी हेमराज पुस्तोडे यांनी सांगितले.

कोरोना ब्रेकिंग : नागपूर समूह संसर्गाच्या दिशेने; एकाच दिवशी आढळले एक हजारावर पॉझिटिव्ह

 "श्री" पद्धतीने धानाची लागवड
शेतकरी हेमराज पुस्तोडे यांना भाजीपाला पिकासाठी उमेदच्या माध्यमातून दहा हजारांचे बिनव्याजी अर्थसाहाय्य सहा महिन्यांकरिता देण्यात आले आहे. सोबत इतर पिके कशी घ्यावी, सेंद्रिय शेतीचा वापर शेतकऱ्यांनी करावा, जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी फळभाजी पिकावर निंबोळी अर्क दशपर्णी अर्क, जीवामृत फवारण्यास उमेदच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. अनेक शेतकरी इतर पिकाकडे वळले असून, शेती करून निरोगी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. या उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस नफा प्राप्त होत आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी "श्री" पद्धतीने धानाची लागवड उमेदच्या माध्यमातून केली आहे.
-आशा शहारे, 
कृषीसखी उमेद अभियान.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer earn about 1 lac rupees by farming