शेतकऱ्याने कुटुंब काढले विक्रीला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

शेतकरी दिवसागणिक वाढत्या समस्यांनी हैराण झाले आहे. ‘कुटुंब घ्या; पण शेती वाचवा’ अशी शेतकरी आर्त हाक देत आहे.

मालेगाव (जि.वाशीम) : मागील सरकारने कर्जमाफी करणार सांगितले पण झाली नाही. आता नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देणार म्हणून सांगितले होते मात्र अजून मिळाली नाही. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. माझा परिवार विकत घ्या मात्र माझी शेती वाचवा अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.

मालेगाव तालुक्यात कोळगाव येथे शेतकरी पुत्र विजय शेंडगे राहतात. यांच्या आजोबांच्या नावावर 7 एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नसल्याने हताश होऊन शेती जगविण्यासाठी परिवार विक्रीला काढला असल्याचं विजय शेंडगे म्हणाले.

हेही वाचा - अकोल्याचा दर्शन आयपीएलमध्ये झळकणार

जगावे कसे असा प्रश्‍न
अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जगावे कसे या चिंतेत आम्ही परिवार विक्रीला काढला आहे, असे शेंडगे म्हणाले. 

क्लिक करा - वऱ्हाडचे समाजस्वास्थ बिघडतेय

अवकाळी पावसाने सर्वस्व वाहून गेले
सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा त्यामुळे जीवन जगणे असाह्य झाल्याने शेतकरी आत्महत्येचा करीत आहेत. त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेल्याने प्रपंच्याचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे, काका अंकुशराव शेंडगे म्हणाले.

अवश्य वाचा - जिल्हा परिषद निवडणुकीत नवाच वाद

कर्जमाफी झाली पण अपुरी
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही घोषणा अपुरी आहे. यामुळे शेतकरी कर्जमुक्त होणार नाही. त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत.
-विजय शेंडगे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer family for sale