वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

file photo
file photo

धामणा (लिंगा) (नागपूर) : हिंगणा व कळमेश्‍वर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धामणा (लिंगा) परिसरातील शिरपूर (भुयारी) शिवारात शनिवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास आमराईत राखण करीत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले.
धामणा (लिंगा) येथील शेतकरी सुधाकर क्षीरसागर यांची शिरपूर शिवारातील आमराई धापेवाडा येथील केशवराव पारसे (वय 62) यांनी ठेक्‍याने घेतली आहे. कुणी आंबे चोरू नेऊ नये, यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आंब्याची राखण करण्यासाठी ते शेतात जातात. शनिवारी ते आंब्याच्या झाडाशेजारी झोपले असताना पहाटेच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. वाघाने हल्ला करताच केशव पारसे हे ओरडले. परिसरातील शेतकरी त्यांच्या दिशेने धावले व जोरजोरात ओरडू लागल्यामुळे वाघाने जंगलाकडे धूम ठोकली. परिसरातील शेतकऱ्यांनी जखमीला गावात आणून उपचार सुरू केले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी इजाज आझमी घटनास्थळी दाखल झाले. जखमी शेतकऱ्यावर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महिन्याभरातील तिसरी घटना
परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी कळमेश्‍वर वनपरिक्षेत्रात असलेल्या नारायण मोहोड यांच्या शेतात बैलगाडीला बांधलेल्या गायी वासरावर वाघाने हल्ला करून वासराचा जीव घेतला. तर गायीला बंडीसह फरपटत नेत जखमी केले. शिवारात घडलेली या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. 4 जूनला शिरपूर येथील रहिवासी रवींद्र संभाजी तुरणकर (वय 45) यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला. यात तुरणकर जखमी झाले. 16 जूनला येथील नारायण फलके यांच्या शेतात त्यांची दोन मुले रमेश, श्रीकांत हे वखरणीचे काम आटोपून बैलांना पाणी पाजण्याकरिता नदी काठावर घेऊन गेले. वाघाने एका बैलावर हल्ला चढवला व जखमी केले. फलके बंधूंच्या सतर्कतेमुळे बैलाचे व त्यांचे प्राण वाचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com