शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेतले तरच विरोधकांसोबत - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न उचलले, तर आपण विरोधकांशी राहू अन्यथा शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोदींना विरोध करू,'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

नागपूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न उचलले, तर आपण विरोधकांशी राहू अन्यथा शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोदींना विरोध करू,'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारासाठी खासदार शेट्टी भंडारा येथे गेले. त्यापूर्वी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी अनेक विरोधी पक्षाचे नेते एकत्र येत आहेत. यात कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते खासदार मुलायम सिंह यादव, राष्ट्रीय जनता दलाचे लालुप्रसाद यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा समावेश आहे. या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न देशात बिकट होत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवरच मोदींना घेरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडून जर विरोधक एकत्र येत असतील, तर आपण देशातील शेतकऱ्यांच्या शंभरावर संघटनांच्या मदतीने मोदी सरकारचा विरोध करू.'' शेट्टी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून पुढील निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत. परंतु, शेट्टी यांच्या या नव्या भूमिकेमुळे पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Web Title: farmer issue raju shetty