esakal | शेतकरी नेते म्हणतात, "कृषिमंत्र्यांनी फिरवली संकटग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ...'' 
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी विदर्भाचा नुकताच दौरा केला. त्यांनी शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचाही दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.

शेतकरी नेते म्हणतात, "कृषिमंत्र्यांनी फिरवली संकटग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ...'' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुक्कामी आले. त्यांनी आपला महत्त्वाचा दीड दिवसांचा वेळ शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी दिला. मात्र, या दौऱ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांनी डोळेझाक केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य निर्माण झाले आहे. सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केला आहे. 

राज्य सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यात "कृषी संजीवनी सप्ताहा'चे आयोजन केले. त्याअंतर्गत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी विदर्भाचा नुकताच दौरा केला. त्यांनी शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचाही दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. यंदा सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. युरियाचे लिंकिंग झाल्याने शेतकऱ्यांना खत मिळत नाही. बॅंकांकडून वेळेवर कर्जपुरवठा झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. 

हेही वाचा - अफलातून..! एमबीबीएस एम.डी. डॉक्‍टर निघाला केवळ बारावी पास

कृषिमंत्री सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट कोसळलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील, अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. उमरखेड, महागाव व पुसद तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांनी त्यांची दिग्रस तालुक्‍यातील वाई-लिंगी येथे कार्यक्रमस्थळी भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कार्यक्रमच रद्द झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या समस्या सांगता आल्या नाहीत. तर या आयोजित कार्यक्रमस्थळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. कृषी विभागाने निवडक शेतकऱ्यांच्या सत्काराचा आयोजित केलेला कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. 

अधिक माहितीसाठी - माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच... 

बोगस बियाणे व रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात यावे. तसेच दुबार पेरणीचे संकट कोसळलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. 
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ.