तिवारींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आणि इतर वेळीही कोरोनासंबंधातील सर्व नियमांचे स्वतः पालन करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. पण स्वतः नियमाची ऐसीतैसी करून इतरांनाही नियम तोडायला सांगताना ते दिसले. त्यांचा हा व्डिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय आणि त्यांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नागपूर : सर्वत्र कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना मास्क वापरणे किती आवश्यक आहे, हे जनतेला सांगण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक संघटनाही या कामी सरसावल्या आहेत. परंतु, स्वतः शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः मास्क तर घातलाच नाही. पण पांढरकवड्याचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनाही घातलेला मास्क काढायला सांगितला. काय तर म्हणे, फोटोत तुम्ही कोण आहात, ते कुणाला ओळखू येणार नाही.
एकंदरीत काय तर कोरोना गेला खड्ड्यात पण छटाकभर कार्यक्रमाची प्रसिद्धी आम्ही घेणारच, असाच एकंदर पवित्रा श्री तिवारींचा एका कार्यक्रमात बघायला मिळाला. पण शेतकरी नेत्यांनी सांगूनही ठाणेदारांनी आपला मास्क काढला नाही आणि शासनाच्या कोरोनासंबंधी असलेल्या नियमाचे पालन केले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
तिवारींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आणि इतर वेळीही कोरोनासंबंधातील सर्व नियमांचे स्वतः पालन करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. पण स्वतः नियमाची ऐसीतैसी करून इतरांनाही नियम तोडायला सांगताना ते दिसले. त्यांचा हा व्डिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय आणि त्यांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील पांढरकवडा येथे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. त्यामुळे व्यापारी संघटनेने कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गांधी जयंतीदिनी व्यापारी संकुलात एका समारंभात सिलिंडरचे लोकार्पण करण्यात आले. त्या कार्यक्रमात घडलेला हा प्रकार अनेकांना विचार करायला लावणारा आहे.
काही ठिकाणी लोक प्रशासनाची विनंती ऐकत नाहीत, म्हणून मास्क न घातल्यास दंडसुद्धा आकारण्यात येतो आहे आणि शेतकरी नेते चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच घातलेला मास्क काढायला सांगतात, ही गोष्ट अनेकांना रुचलेली नाही.
संपादन - नीलेश डाखोरे