शेतकऱ्याने घरीच तयार केले खत देण्याचे यंत्र; मजुरांच्या तुटवड्यावर केली मात 

शशांक देशपांडे 
Saturday, 17 October 2020

पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि यामुळे कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी प्रवीण ठाकरे यांनी बैलजोडीच्या साह्याने खत देण्याचे यंत्र तयार केले.

दर्यापूर (जि. यवतमाळ) ः  शेतीकामासाठी मजुरांचा तुटवडा आणि त्यामुळे होणारा कामाला विलंब या समस्येवर मात करण्यासाठी दर्यापूर तालुक्‍यातील शिवर येथील युवा शेतकरी प्रवीण ठाकरे यांनी चक्क बैलजोडीच्या साह्याने शेतात खत देण्याचे यंत्रच तयार केले आहे.

पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि यामुळे कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी प्रवीण ठाकरे यांनी बैलजोडीच्या साह्याने खत देण्याचे यंत्र तयार केले. विशेष म्हणजे यासाठी या शेतकऱ्याने टाकाऊ साहित्याचाच वापर केला आहे. 

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतीतील अधिकाधिक कामे कशी करता येतील यासाठी ते सतत कार्यशील असतात. याच प्रयोगातून त्यांनी कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रभावीरीत्या बैलजोडीच्या मदतीने खत पेरणी यंत्र तयार केले आहे. यासाठी कृषिकन्या कृषी महाविद्यालय पुणेची विद्यार्थ्यांनी तन्वी देशमुख व प्रोग्राम ऑफीसर डॉ. बगाडे यांचे सहकार्य लाभले.

 बैलजोडीच्या साह्याने खत देणाऱ्या यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या शेतात केले आणि ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या यंत्रामध्ये एका वेळेला १५ ते ३० किलो खत भरू शकतो. कुठल्याही प्रकारच्या खताच्या उपाययोजनांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे, असे प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी यशस्वी करून दाखविले. प्रवीण ठाकरे यांनी हा प्रयोग करून कमी खर्चात बैलजोडीच्या साह्याने खत देण्याची कामगिरी साधली आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.

अतिशय सोपे यंत्र

हे यंत्र बनविताना पाण्याची मोठी प्लॅस्टिकची बरणी, ४ फुटाची लोखंडी पट्टी, तीन चाडे यांना एकत्रित करून शेती वापरातील वखरावर बसवितात. प्लॅस्टिकची बरणी मागून कापून ती चाड्यावर उलटी बसवून त्यात खत भरतात. कपाशीला फेर धरताना ही क्रिया केल्यास फेरासह खतही देता येणार आहे. अतिशय कमी खर्चातील ही प्रक्रिया असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे, अशी माहिती प्रवीण ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

पावसाळ्यात शेतकऱ्यांना मजुरांच्या कमतरतेसोबतच आर्थिक अडचणही जाणवते. यामुळे शेती पिकविणे कठीण जाते. अतिशय कमी खर्चात आता शेतीला खत देता येणार असल्याने या यंत्राचा फायदा होणार आहे. मी याबाबत शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन देणार असून आवश्‍यक असल्यास हे यंत्र मोफत बनवून देणार आहे, जेणेकरून कमी खर्चात शेती करता येईल.
- प्रवीण ठाकरे, 
शेतकरी, शिवर.

संपादन -  अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer made fertilizer spreading machine at home