झोपेतून उठताच घरात दिसला नाही कर्ता पुरुष; चिठ्ठी सापडताच अंगाचा उडाला थरकाप 

farmer is missing after writing death note in Amravati district
farmer is missing after writing death note in Amravati district

चांदूरबाजार (जि. अमरावती) ः  देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुखदेव सुने (वय 40) हे सोमवारी (ता. 11) रात्रीपासून बेपत्ता आहेत. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी घरात सापडल्याने देऊरवाडा व शिरजगावकसबा येथील त्यांच्या नातेवाइकांसह परिसरात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, विजय सुने यांची पत्नी वैशाली यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अब्दागिरे शिरजगाव पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. विजय सुने यांचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

बेपत्ता शेतकरी विजय सुने यांची पत्नी वैशाली यांनी शिरजगावकसबा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पती विजय सुने यांच्यासह घरचे सर्वजण झोपी गेल्यावर आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली व ते घरून निघून गेले. सकाळी कुटुंबीय झोपेतून उठल्यावर पती घरी दिसून आले नाही. शेतात व सर्वत्र शोध घेतल्यानंतर माहिती मिळाली नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पतीने आत्महत्या केली तर त्यासाठी बीट जमादार तायडे, ठाणेदार सचिन परदेशी, राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचे निकटवर्ती दीपक भोंगाळे तसेच चांदूरबाजारचे तहसीलदार धीरज थूल जबाबदार असतील, असे त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. 

विजय सुने यांच्या नावे शिरजगावकसबा मार्गावरील जंगलात 80 आर शेत आहे. त्या शेताच्या बाजूला दुसऱ्या शेतकऱ्याची संत्राबाग आहे. या शेतात जाण्यासाठी विजय सुने यांच्या शेतातून रस्ता असल्याचे प्रकरण तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ठ आहे. पण शेजारच्या शेतातील संत्रापीक हे नाशवंत असल्यामुळे काही दिवसांच्या कालावधीसाठी विजय सुने यांच्या शेतातून वाहतूक करण्याचे आदेशपत्र दोन्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थूल यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विजय सुने यांच्या शेतात केळी पिकाचे नुकसान होणार असल्यामुळे त्यांनी या वाहतुकीला विरोध केला होता. 

शेजारच्या शेतकऱ्याने संत्रापीक निघण्यासाठी पोलिस विभागाला पोलिस संरक्षण मागितले. याप्रकरणात शिरसगावकसबा येथील ठाणेदार सचिन परदेशी तसेच देऊरवाडा येथील बीट जमादार श्री. तायडे यांनी महसूल कार्यालयाच्या पत्रानुसार विजय सुने यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यासंदर्भात माहिती दिली, असे ठाणेदार सचिन परदेशी यांच्याकडून सांगण्यात आले. 

पोलिसांवर रोष 

दरम्यान, शेतकरी विजय सुने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी घर सोडून गेल्याची अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शिरजगाव पोलिस ठाण्यात गावातील लोकांनी प्रचंड गर्दी केली. पोलिसांवर रोष निर्माण होत असल्यामुळे राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोपट अब्दागिरे यांनी काही वेळेतच शिरजगाव पोलिस ठाण्यात येऊन नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

तहसीलदारांना पत्रव्यवहार करून माहिती देणार 

शेतकरी विजय सुने यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली. हे प्रकरण शेतीसंदर्भात असल्यामुळे यानंतर तहसील कार्यालय याप्रकरणात हस्तक्षेप करेल आणि संबंधित पोलिस ठाणे या शेती रस्ता वादप्रकरणी चांदूरबाजार तहसीलदारांना पत्रव्यवहार करून तशी माहिती देणार असल्याची ग्वाही उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अब्दागिरे यांनी सुने कुटुंबातील सदस्यांना दिली. 

जमादाराची बीट बदलविली

तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत असून विजय सुने यांचा शोध सुरू असल्याचे शिरजगावचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी सांगितले. संबंधित बीट जमादाराचे बीट बदलविण्यात आल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांचा माल शेतातून काढण्यासाठी तात्पुरता रस्ता देण्याची मागणी सर्वत्र असते. तात्पुरत्या रस्त्याचा हा मुद्दा आहे, कायमस्वरूपी नव्हे. काही लोकं माझे नाव घेऊन बदनामी करण्यासाठी राजकारण करीत आहेत. कुणावरही अन्याय होणार नाही, ही माझी भूमिका आहे. 
-बच्चू कडू, 
राज्यमंत्री

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com