शेतात गेलेल्या पत्नीला पती काही दिसले नाही... ते घरी गेल्याचे समजून काम करीत होत्या, मात्र...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून मदत देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मृतदेह न उचलण्याचा आग्रह धरला. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. वनविभागाकडून 15 हजार व करडीचे ठाणेदार नीलेश वाजे यांच्याकडून 10 हजार रुपये कुटुंबीयांना देण्यात आले.

मोहाडी (जि. भंडारा) : शेतमालाच्या जागलीला गेलेल्या शेतकऱ्याच्या मागे वन्यप्राणी धावल्याने त्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हरिश्‍चंद्र राऊत (वय 45, रा. ढिवरवाडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृतदेह न उचलण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आजी व माजी आमदारांनी मध्यस्थी करून गावकऱ्यांना शांत केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

हरिश्‍चंद्र राऊत यांची ढिवरवाडा जंगलाला लागूनच शेती आहे. ते नेहमीप्रमाणे शेतावर जागलीसाठी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरून गेले होते. 11 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी शेतावर गेली. मात्र, तिला हरिश्‍चंद्र दिसले नाही. गावात गेल्याचे समजून दोन वाजेपर्यंत शेतातील काम करून ती घरी परतली. सायंकाळी पती घरी न आल्याने तिने मुलांना सांगितले.

#SundaySpecial, Video : राजे-रजवाडे गेले अन्‌ राजपूत ठाकूर समाजावर आली ही वेळ...

मुलाने शेतात जाऊन शोधाशोध केली. गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. वनविभाग व पोलिसांना माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने रात्री 12 वाजेपर्यंत शोध घेतला. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेताजवळील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. जागलीला गेल्यानंतर वन्यप्राणी धावल्याने हरिश्‍चंद्र यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला.

मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून मदत देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मृतदेह न उचलण्याचा आग्रह धरला. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. वनविभागाकडून 15 हजार व करडीचे ठाणेदार नीलेश वाजे यांच्याकडून 10 हजार रुपये कुटुंबीयांना देण्यात आले. परंतु, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात लेखी आश्‍वासन जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला.

रोजीरोटी देणाऱ्या ट्रकने सहा महिन्यात दोनदा केला एकाच कुटुंबाचा घात

आजी-माजी आमदारांची मध्यस्थी

आमदार राजू कारेमोरे यांनी उपवनसंरक्षकांशी चर्चा करून मदत देण्याची मागणी केली. माजी आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला त्वरित मदत द्यावी, अशी सूचना केली. यानंतर आजी व माजी आमदारांच्या मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी मृतदेह उचलला. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer submerged in water in Bhandara district