स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले व त्यात स्वतःला जाळून घेतले. 

जाणे यांच्याकडे शेती नसली तरी त्यांच्या मुलाच्या नावाने मदना शिवारात ४ एकर शेती आहे. याच शेतीवर दोघेही बापलेक काबाडकष्ट करून संसाराचा गाडा रेटत होते. पण, गोपाळरावांना किडनीचा तर मुलगा प्रमोद याला कर्करोगाचा आजार असल्याने त्यांच्या औषधोपचाराच्या खर्चाने त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. याचमुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर चढत चालला होता. ५३ वर्षीय मुलगा प्रमोद यांना तीन मुली असून एक मुलीचे काही वर्षांपूर्वीच कर्ज घेऊन लग्न केले. आता दोन मुली पुन्हा लग्नाच्या असल्याने त्यांच्या लग्नाचा प्रश्न कायम होता. यात मुलाच्या शेतीवर घेतलेले बॅंकेचे १ लाख ७५ रुपयांचे कर्ज आहे, ते वेगळेच. जलालखेडा येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेतून हे कर्ज घेतले असून कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळाला नाही. या सर्व परिस्थितीपुढे गोपाळराव जाणे यांची हिंमत खचली होती. त्यांनी आत्महत्या  करण्याचे ठरविले. पूर्वी त्यांनी दोनवेळा असा प्रयत्न केला, पण ते यातून बचावले होते. 

शुक्रवारी ( ता.१) सकाळी ११.३० वाजता गोपाळराव यांनी शेतातील कचरा गोळा करून त्यात आग लावली व उडी घेतली. त्यावेळी त्यांचा मुलगा शेतातच काम करीत होता. मात्र, वडिलांनी कचरा पेटविला असावा असा विचार त्याने केला व आगीकडे दुर्लक्ष केले. काही वेळा नंतर मात्र वडिलांचा जळालेला मृतदेह त्याला दिसून आला. आसपासच्या शेतकऱ्यांच्या साहाय्याने आग विझविली. मात्र, तोपर्यंत गोपाळरावांचा मृत्यू झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Suicide