शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट

शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट
जलालखेडा (नागपूर) : मृग संपला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अस्मानी संकटाने ग्रासले असताना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी वामनराव विठोबा मानेकर (वय 56, रा. जलालखेडा) यांनी शुक्रवारी सकाळी शेतातच विष घेत आत्महत्या केली. मानेकर हे दीड एकर शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेती वडिलांच्या नावे असल्यामुळे बॅंकेतून कर्ज मिळत नसल्याने दुसऱ्यांकडून कर्ज घ्यायचे. परंतु, मागील वर्षी पावसाने धोका दिला व शेतीत काहीच पिकले नाही. मागील वर्षीचे कर्ज न फेडल्याने कुणी कर्ज देणार नाही व आपली शेती पडीत राहील या विचारात मानेकर जगत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ते शेतात गेले व विष प्राशन केले. मानेकर हे शेतात पडले असल्याचे युवकाने बघितले व मुलाला फोन केला. मुलगा ऑटो घेऊन शेतात गेला व वडिलांना जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे यांनी प्राथमिक औषधोपचार करून त्यांना नागपूरला पाठविले. मात्र, काही अंतरावर मानेकर यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides