बोंडअळीने शेतकरी त्रस्त, दहा एकरातील कापसावर चालविला ट्रॅक्टर

farmer turned tractor on cotton in 10 acre in rajura of chandrapur
farmer turned tractor on cotton in 10 acre in rajura of chandrapur

राजुरा : यावर्षी पडलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला.  सोयाबीन पिकाने दिलेली हुलकावणी व कपाशी पिकावर आलेल्या बोंडअळीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. ऐन दिवाळीच्या सणाला घरातील रास रिकामी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळत आहे. माथरा येथील सुधाकर ताजणे या शेतकऱ्याने आपल्या दहा एकर शेतात असलेल्या कपाशीला बोंडअळीने रोगाने ग्रासल्याचे पाहून त्यावर ट्रॅक्‍टर चालविला.       

सोयाबीन पिकाला नसलेली उतराई, त्यासाठी आलेला खर्च जास्त व उत्पन्न कमी यामुळे शेतकऱ्यांची आशा पांढऱ्या सोन्यावर होती. परंतु, पांढऱ्या सोन्यावर आलेल्या बोंडअळी या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कृषी विभागाने गावागावात जाऊन बोंडअळी रोगाविषयी जनजागृती करीत आहे. मात्र, या रोगाची बाह्य लक्षणे दिसत नसल्याने बोंड तोडून पाहिल्याशिवाय माहिती होत नाही. अशा परिस्थितीत जास्त दिवस पीक उभे राहिल्यास रब्बी पीकसुद्धा हातातून जाण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने बहुतांश शेतकरी पीक उद्‌ध्वस्त करीत आहे.

राजुरा-कोरपना तालुक्‍यातील शेतकरी सोयाबीन व कपाशी हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. मात्र, यावर्षी सोयाबीन पिकाला उतराई नाही. तसेच कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. खरीपानंतर रब्बी पीक घेऊन वर्षभर पोट भरतील यासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून शेतकरी राबराब राबतो. मात्र, निसर्ग साथ देत नसल्याने नेहमी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असते. दिवाळीच्या तोंडावर कपाशीच्या पिकाची रास घरात पडेल, या आशेवर असलेल्या सुधाकर ताजणे या शेतकऱ्याने मोठा आर्थिक खर्च करीत आपल्या दहा एकर शेतात कपाशीच्या पिकाची लागवड केली. सतत पडणाऱ्या पावसापासून बचाव करीत पीक जगविले. कपाशीचे पीक हातात येईल व काढलेल्या कर्जाची थोडीफार परतफेड होईल हे स्वप्न उराशी घेऊन असलेल्या सुधाकर ताजणे या शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून माझ्यासारख्या शेकडो शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. 

दहा एकर शेतात लाख रुपये खर्च करून राशी कपाशीच्या पिकाची लागवड केली. दिवाळीच्या तोंडावर पीक घरी येईल, अशी आशा होती. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पीक मिळणार नसल्याचे लक्षात आले. यामुळे दहा एकर शेतात असलेल्या कपाशी पिकावर ट्रॅक्‍टर चालविला. 
- सुधाकर ताजणे, शेतकरी, माथरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com