मूर्तिजापूर : शेतकऱ्यांचे कमळगंगा नदीपात्रात बेमुदत धरणे!

अविनाश बेलाडकर 
मंगळवार, 16 मे 2017

आधीच हवालदिल झालेल्या असंख्य शेतकरी बांधवांच्या हिताचा हा प्रश्न आहे. 'जलयुक्त' वर शासनाचा भर आहे. तरीसुद्धा आमच्यावर अन्याय का? मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. गरज वाटल्यास आंदोलनाचे स्वरुप तीव्र करण्यात येईल.
- सुरेश जोगळे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

मूर्तिजापूर - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या तालुक्यातील हातगांव येथील कमळगंगा नदीच्या रेल्वेपुलापासून रामखेड पर्यंत च्या नदीपात्राचे रखडलेले खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वात आज पासून नदीपात्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सदर काम पुलापासून केवळ ४८० मिटर एवढेच करण्यात आले. प्रत्यक्षात ते रामखेड गावापर्यंत म्हणजे एकूण २००० मिटर एवढे अपेक्षित आहे. ज्यामुळे लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. भूजल पातळी वाढून जलस्त्रोत सजल होऊ शकतात व शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न काही अंशी मिटू शकतो. 

त्यामुळे हे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने सुरेश जोगळे यांनी गत २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना दिले होते. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा त्याला कारणीभूत असल्याचे तसेच कार्यकारी अभियंता बोके यांनी 'पैसा नसल्याचे' कारण पुढे केल्याचे नमूद करणाऱ्यां या निवेदनात १६ मे १७ पासून नदीपात्रात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सुरेश जोगळे यांच्यासह रमेश हेंगळ, प्रभाकर जोगळे, गजानन डाबेराव, शैलेश जोगळे, गोपाल तायडे, श्रीकृष्ण सातींगे, विनोद जोगळे, मंगेश डांगे, शिवा राऊत, गुलाबराव म्हसाये, पंकज वानखडे, राजू काकड, रामदास ठाकरे आदि शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आधीच हवालदिल झालेल्या असंख्य शेतकरी बांधवांच्या हिताचा हा प्रश्न आहे. 'जलयुक्त' वर शासनाचा भर आहे. तरीसुद्धा आमच्यावर अन्याय का? मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. गरज वाटल्यास आंदोलनाचे स्वरुप तीव्र करण्यात येईल.
- सुरेश जोगळे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

कमळगंगा पथदर्शी प्रकल्पाचे काय ?
या तालुक्यातील २५ गावांचा हजारो हेक्टर भूभाग कवेत घेणारी कमळगंगा, कमळणी येथे उगम पावून २५ किमी प्रवासानंतर वाघजाळी येथे उमा नदीत विलीन होते. ती बारमाही वाहाती करुन परिसरातील जलस्त्रोत सजल करणारा भूगर्भशास्त्रज्ञ यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी 'कमळगंगा पथदर्शी प्रकल्प', आमदार हरीश पिंपळे यांच्या २००९ ते २०१४ या प्रथम पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या पुढाकारातून अख्खे मंत्रालय पालथे घालूनही १०कोटी रुपयांचा निधी प्राप्त करु शकला नव्हता. आमदार पिंपळे यांनी महात्मा फुले जल भूमी अभियानातून व स्वखर्चातून या नदीवरील हातगावच्या बंधार्याचे खोलीकरण व रुंदीकरण करुन परिणाम सुद्धा सिद्ध केला होता. २५ किमी लांब नदीपात्रात ५०० मिटर अंतरावर बंधारे बांधून नदी बारमाही करणे व पाच हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणून २५ गावातील जलस्त्रोत सजल करीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, या प्रकल्पाचे उद्दीष्ट होते. राज्यात भाजप सरकार आल्यानंतरही या प्रकल्पाचे भाग्य फळाला आले नाही. कमळगंगा नदीपात्रातील कामे तुकड्या-तुकड्याने 'जलयुक्त' अंतर्गत होऊ व रखडू लागली. प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत पुन्हा एकदा विचार व्हावा , अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: farmers agitation in the Kamlanganga river bank in Murtijapur